कोरोना रुग्णांची संख्या ३४ वर : पंतप्रधान मोदींनी घेतली मंत्रिमंडळाची बैठक

PM Modi

नवी दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावत परिस्थितीचा आढावा घेतला. कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज राहा, अशा सूचना मोदींनी यावेळी मंत्र्यांना दिल्या. दरम्यान, कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांची संख्या देशात वाढत असून आता कोरोना रुग्णांची संख्या ३४ वर गेली आहे. आज कोरोनाचे तीन रुग्ण आढळून आले. इराणहून लडाखला परतलेल्या दोघांना तर ओमानमधून तामिळनाडूत दाखल झालेल्या एकाला अशा एकूण तिघांना संसर्ग झाला असून या तीन रुग्णांची भर पडल्याने कोरोना रुग्णांची संख्या ३४ वर पोहचली आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी पूर्ण तयारी केली आहे. कोरोनाबाबत दिल्लीत बैठक घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आढावा घेतला.

या बैठकीत केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सरकारने केलेल्या उपाययोजनांची माहिती पंतप्रधान मोदींना दिली. कोरोनाच्या नमुन्यांची तपासणी करण्यासाठी देशात ५२ प्रयोगशाळा सुरू करण्यात आल्याचे हर्षवर्धन यांनी यावेळी सांगितले. या बैठकीला आरोग्यमंत्र्यांसह परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, आरोग्य राज्यमंत्री अश्विनी कुमार यांच्यासह संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.