
कोविड- १९ मुळे (COVID- 19) दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि इंग्लंड (England) दरम्यानची वनडे सामन्याची क्रिकेट (One Day Cricket) मालिका पुढे ढकलण्यात आली आहे. त्याआधी झालेली टी-२० सामन्यांची मालिका इंग्लंडने ३-० अशी जिंकली होती. या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेच्या स्थगितीसोबतच इंग्लंड संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा आटोपला आहे. दक्षिण आफ्रिका संघातील एक खेळाडू आणि संघांची व्यवस्था असलेल्या हॉटेलातील दोन कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
इंग्लंडच्या संघातीलही दोन खेळाडू पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त आहे; पण त्याची पुष्टी होऊ शकलेली नाही. मालिका रद्द झाल्याबाबतच्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, खेळाडूंचे मानसिक व शारीरिक आरोग्य आणि खेळाडूंचे हित ध्यानात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. इंग्लंडच्या त्या दोन खेळाडूंची पुन्हा चाचणी घेण्यात येणार असून त्याचा अहवाल मंगळवारी येणार आहे. त्यानंतरच इंग्लंडचा संघ मायदेशी परतणार आहे. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानची ही वनडे सामन्यांची मालिका आयसीसीच्या सुपर लीगचा भाग आहे.
त्यामुळे दोन्ही संघांची मंडळे ही मालिका पुन्हा कधी आयोजित करता येईल याचा विचार करत आहेत. इंग्लंड मंडळाचे मुख्याधिकारी टॉम हॕरिसन म्हणाले की, खेळाडूंचे हित सर्वाधिक महत्त्वाचे आहे. सीएसएचे मुख्याधिकारी कुगांद्री गोवेंदर म्हणाले की, या परिस्थितीत खेळाडूंच्या मन:स्थितीवर होणाऱ्या परिणामांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. त्यामुळे अतिशय विचारपूर्वक हा मालिका स्थगितीचा निर्णय घेतला आहे. हे खेळाडू दीर्घकाळापासून बबलमध्येच राहात आहेत. त्यामुळे त्यांची काळजी घेणे सर्वांत महत्त्वाचे आहे, असे आणखी एक अधिकारी अॕशली गाईल्स यांनी म्हटले आहे. दरम्यान, केपटाउन येथे इंग्लंडच्या संघाने नेटमध्ये सराव केल्यामुळे ही लागण झाल्याच्या वृत्ताचा इंग्लंडने इन्कार केला आहे.
इंग्लंडच्या संघाला मिळालेल्या सुविधा योग्य नव्हत्या म्हणून नेटमध्ये सराव करावा लागल्याचे त्यांनी म्हटले आहे. पहिला वनडे सामना शुक्रवारी असताना इंग्लंडच्या संघाने गुरुवारी नेटमध्ये सराव केला होता. दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू पॉझिटिव्ह आढळल्यावर पहिला सामना न खेळण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
त्यानंतर हॉटेलचा कर्मचारीही पॉझिटिव्ह आढळल्यावर रविवारचा सामनासुद्धा होऊ शकला नव्हता. त्यापाठोपाठ इंग्लंडचे दोन खेळाडू पॉझिटिव्ह असल्याचे वृत्त आले. गेल्या मार्चमध्ये कोरोनामुळेच (Corona) इंग्लंडचा संघ श्रीलंकेचा दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतला होता. त्यानंतर त्यांचा हा पहिलाच परदेश दौरा होता. मायदेशी मँचेस्टर व साऊथम्प्टन येथे बायोसेक्युअर बबलमध्ये ते सामने खेळले होते.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला