सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे गंभीर प्रकरणावर पांघरून? फडणवीसांचा दावा

Devendra Fadnavis & Uddhav Thackeray

मुंबई :- परमबीर सिंग यांच्या पत्रानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis)यांनी ठाकरे सरकारविरोधात आणखी गौप्यस्फोट केले. पोलीस बदल्यांचं रॅकेट कार्यरत होतं. त्यासंदर्भात फोन टॅपिंग करण्यात आलं. मात्र, सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फोन टॅपिंग प्रकरणावर पांघरूण घातलं, की आणखी काही गोष्टीमुळे लक्ष दिल नाही, असा थेट आरोप फडणवीस यांनी केला आहे. त्याचबरोबर या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केंद्रीय गृहसचिवांकडे करणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे. त्यामुळे ठाकरे सरकार काय भूमिका मांडणार हे महत्त्वाचं ठरणार आहे.

आज मुंबई येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मोठे गौप्यस्फोट केले. तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांच्यामार्फत पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटबाबतचा एक अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना दिला होता. तसेच या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करण्याची शिफारसही करण्यात आली होती. परंतु मुख्यमंत्र्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं, असं सांगतानाच या प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी झाली पाहिजे. त्यासाठी आज राज्याच्या गृहसचिवांना भेटणार असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

यावेळी फडणवीस म्हणाले की, परमबीर सिंग हे तक्रार करणारे पहिले व्यक्ती नाहीत. डीजींनी यापूर्वी एक रिपोर्ट दिला आहे. यापूर्वी श्मी शुक्ला यांनी २५ ऑगस्ट २०२० रोजी ही माहिती पोलीस महासंचालकांना दिली. २६ तारखेला पोलीस महासंचालकांनी ही माहिती तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पाठवली. या सगळ्या प्रकाराची सीआयडीकडून चौकशी होणे गरजेचे आहे, असं पोलीस महासंचालकांनी आपल्या अहवालात म्हटलं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याविषयी समजल्यानंतर त्यांनीही चिंता व्यक्त केली. मात्र, यावर कारवाई करण्याऐवजी हा अहवाल त्यांनी गृह विभागाकडे पाठवला. ही माहिती बघितल्यानंतर गृह मंत्रालयाने कारवाई करणे सोडाच, पण गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्तांनाच शिक्षा केली. त्यांना अपेक्षित बढती मिळाली नाही. त्यानंतर गुप्तचर विभागाच्या डेटामध्ये नमूद केल्याप्रमाणेच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या,” असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला.

ज्यांनी हे प्रकरण उघडकीस आणलं त्या सीओआय यांना अडगळीच्या ठिकाणी प्रमोशन देण्यात आलं. प्रमोशन दिल्याचं भासवण्यात आलं. तर ज्यांचा या प्रकरणात हात होता त्यांना चांगल्या ठिकाणी पोस्टिंग देण्यात आली. त्यामुळे सुबोधकुमार जैस्वाल यांनी या पोस्टिंगला विरोध केला. तेव्हा दबावात हे सर्व होतंय असं लक्षात आल्यानंतर त्यांनी डेप्युटेशन मागून घेतलं, असा दावा फडणवीस यांनी केला.

दरम्यान,आज या प्रकरणाचा सर्व डेटा मी गृहसचिवांना देणार आहे. त्यांच्याकडे सर्व पुरावे देणार असून या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी करणार आहे. त्यासाठी मी आज दिल्लीला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. या अहवालात अनेक अधिकारी आणि राजकारण्यांची नावे आहेत. तसेच या डेटामधील आवाज त्यांचाच आहे की नाही? याची चौकशी झाली पाहिजे, त्याशिवाय कुणाचेही नाव घेता येणार नाही, असं सांगतानाच हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्याने त्याची कागदपत्रे मीडियाला देता येणार नसल्याचंही त्यांनीस्पष्ट केलं.

ही बातमी पण वाचा : शरद पवारांच्या तोंडून चुकीच्या गोष्टी वदवून घेतल्या गेल्या; देवेंद्र  फडणवीसांचा पलटवार 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER