वाहतूक पोलिस विलास शिंदेंची हत्या करणाऱ्या कुरेशीला जन्मठेप

मुंबई :- वाहतूक पोलिस विलास शिंदे यांची हत्या करणाऱ्या आरोपी अहमद मोहम्मदअली कुरेशीला मुंबई सत्र न्यायालयाने आज शनिवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. आरोपीवर दया दाखवल्यास, समाजात चुकीचा संदेश जाऊ शकतो, त्यामुळे कठोर शिक्षेस तो पात्र असल्याचे न्या. किशोर जयस्वाल यांनी आज आपल्या निकालात स्पष्ट केले. जन्मठेपेसोबतच कुरेशीला ५० हजारांचा दंडही ठोठावण्यात आला. यातील ४५ हजारांची रक्कम शिंदे यांच्या पत्नीला देण्याचे निर्देश न्यायालयाने दिलेत. अनुकंपा योजनेनुसार, राज्य सरकारने शिंदे कुटुंबीयांची काळजी घ्यावी, असेही निर्देश न्यायालयाने दिले आहेत. विलास शिंदे यांना राज्य सरकारने ‘शहीद’ दर्जा दिला आहे, हे येथे उल्लेखनीय.

काय घडले होते?

वाहतूक पोलिस विलास शिंदे हे २३ ऑगस्ट २०१६ रोजी मुंबईतील खार येथे कार्यरत असताना एक अल्पवयीन मुलगा हेल्मेटविनाच दुचाकीवर आला. शिंदे यांनी या तरुणाकडे हेल्मेट नसल्याने विचारणा केली. परवानाही मागितला. त्या मुलाने मोबाईलवरुन भावाला बोलविले. आरोपी कुरेशी हा घटनास्थळी आल्यावर, त्याने शिंदे यांच्यासोबत वाद घातला. अचानक कुरेशीने बाजूला असलेला बांबू उचलून शिंदे यांना मारहाण केली. त्यात शिंदे खाली कोसळले. त्यानंतर तीन दिवसांनी शिंदे यांचा रुग्णालयात मृत्यू झाला.