१२ इंडोनिशियन तब्लिगींना कोर्टाने केले पूर्ण आरोपमुक्त

Court Remove Charges from Indonesian preachers

मुंबई : गेल्या मार्चमध्ये दिल्लीत तब्लिगी जमातच्या धार्मिक अधिवेशनाला हजर राहून नंतर मुंबईत आल्यावर अटक केलेल्या इंडोनेशियाच्या १२ नागरिकांना वांद्रे येथील महानगर दंडाधिकार्‍यांच्या ३४ व्या न्यायालयाने सर्व आरोपांतून पूर्णपणे मुक्त केले.

हे सर्व विदेशी नागरिक पर्यटक व्हिसावर भारतात आले होते. दिल्लीहून मुंबईत आल्यावर एका मशिदीत किंवा काही परिचितांच्या घरी राहात होते. नंतर ‘लॉकडाऊन’ जाहीर झाल्याने त्यांना मायदेशी परत जाता आले नाही. विदेशी नागरिक कायद्याचे (Forieners Act) उल्लंघन करणे तसेच आपत्ती निवारण कायद्यान्वये सरकारने लागू केलेल्या निर्बधांचे पालन न करून कोरोना महामारी पसरविण्यास कारणीभूत ठरणे, अशा आरोपांवरून पोलिसांनी त्यांना अटक केली होती.

सुरुवातीस त्यांच्यावर सदोष मनुष्यवध (भादंवि कलम ३०४) (IPC S.304)  इतरांचा जीव धोक्यात आणणे (कलम ३०६) हे गुन्हेही नोंदविण्यात आले होते. परंतु कोरोना चाचणी केली असता एकाचीही चाचणी ‘पॉझिटिव्ह’ आली नाही. त्यामुळे प्रॉसिक्युटरने स्वत:हून आरोपत्रातील हे गुन्हे काढून टाकले.

या पार्श्वभूमीवर आरोपींनी उरलेल्या गुन्ह्यांतूनही आरोपमुक्त करण्यासाठी अर्ज केला. तो मंजूर करताना अतिरिक्त महानगर दंडाधिकारी जयदेव घुले यांनी म्हटले की, तपासाची कागदपत्रे व आरोपत्रातील तपशील पाहता या आरोपींनी त्यांच्यावर ठेवलेल्यापैकी एकही गुन्हा केल्याचे सकृद्दर्शनी दिसत नाही. ते भारतात आले तेव्हा त्यांचा व्हिसा वैध होता. त्यामुळे त्यांनी परकीय नागरिक कायद्याचा भंग केला, असेही होत नाही. शिवाय कोरोना पसरवून इतरांची जीव धोक्यात घालण्याचा आरोप तर पोलिसांनी स्वत:हून मागे घेतला आहे. अशा परिस्थितीत त्यांच्यावर खटला सुरु ठेवण्यासारखे काहीच शिल्लक राहात नाही. या सर्वांचे जप्त केलेले पासपोर्ट त्यांना परत करण्याचाही आदेश दिला गेला.

केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या इतर राज्यांमध्येही अशा हजारो परदेशी तब्लिगींवर असेच खटले भरले गेले. त्यापैकी बहुतांश निर्दोष सुटले. अशाच एका प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने ‘माध्यमांनी भडक चित्र रंगवून घबराट निर्माण केल्यावर पोलिसांनी या विदेशी तब्लिगींना बळीचा बकरा बनविले’ असे ताशेरेही मारले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER