बनावट नोटा भारतीय चलनात वटवण्यासाठी बाळगणा-या दोघांना शिक्षा

money laundering in Indian currency,2 arrested.jpg

ठाणे : बनावट नोटा भारतीय चलनात वटवण्यासाठी बाळगणा-या भिवंडीतील दोघांना बुधवारी ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी.जी.मुरूमकर यांनी दोषी ठरवत कारावासाची शिक्षा सुनावली.यामध्ये एका मोबाईल दुकानदाराचा समावेश असून एकाला चार वर्ष तर दुस:याला तीन वर्षे अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ही घटना भिवंडी परिसरात 2016 रोजी घडली होती.तर या खटल्या सरकारी वकील म्हणून उज्ज्वला मोहोळकर यांनी काम पाहिले होते.

ठाणे शहर पोलीस दलाचे मध्यवर्ती गुन्हे शाखेचे तात्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास घेवारे यांच्या पथकाने भिवंडी परिसरातील शिवाजी चौक येथून 9 जानेवारी 2016 रोजी भिवंडीतील जानू उर्फ जनार्दन त्रिंबक दिवेकर (29) आणि निलेश शरद दाभाडे या दोघांना मिळाल्या माहितीनुसार अटक केली होती. त्यांच्याकडून एक हजाराच्या नोटा असे दीड लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या. तर, निलेश याच्या मोबाईल शॉपमधून एक हजार आणि शंभर रु पये किमतीच्या 47 हजार 300 रु पयांच्या बनावट नोटा मिळून आल्या होत्या.

याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तर हा खटला न्यायाधीश मुरूमकर यांच्या न्यायालयात आल्यावर सरकारी वकील मोहोळकर यांनी सादर केलेले पुरावे, युक्तीवाद आणि साक्षीदारांची साक्ष ग्राह्य मानून त्या दोघांना दोषी ठरवत,जनार्दन दिवेकर याला चार वर्ष कारावास आणि एक हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास त्याला दोन महिने कैदेची शिक्षा भोगावी लागणार आहे. तसेच मोबाईल दुकानदार निलेश याला तीन वर्ष कारावास आणि दोन हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली असून दंड न भरल्यास त्यालाही दोन महिने अतिरिक्त शिक्षा भोगावी लागणार आहे.