दैनंदिन वस्तूंवरील जीएसटी घटणार, सामान्य जनतेला दिलासा

नवी दिल्ली : वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परिषदेच्या येत्या आठवड्यात होणाऱ्या बैठकीत दैनंदिन वापराच्या वस्तूंवरील जीएसटी कमी करण्याचा विचार होणार आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखालील ही बैठक १० नोव्हेंबरला होणार आहे.

या बैठकीत हाताने बनवलेलं फर्निचर, प्लास्टिक उत्पादने, शाम्पू आदि वस्तूंवर लावण्यात आलेल्या जीएसटीवर फेरविचार केला जाणार आहे. दैनंदिन वापराच्या वस्तूंवर तब्बल २८ टक्के जीएसटी लावण्यात आल्यामुळे वस्तू फार महाग झाल्या आहेत. याचा परिमाण लघु आणि मध्यम उद्योजकांच्या व्यवसायांवर पडला आहे. त्यामुळे जीएसटी परिषद अशा जीएसटीचा मोठा फटका बसलेल्या उद्योगांतील करप्रणाली तर्कसंगत बनवण्यासाठी काम करत आहे. या उद्योगांना जीएसटी येण्या अगोदरपासूनच मूल्यवर्धित कर, उत्पादन शुल्कातली दरात सूट आदी गोष्टींमुळे त्रास सहन करावा लागत होता.

१ जुलैपासून जीएसटी लागू झाल्यापासून दर महिन्याला जीएसटी परिषद बैठक घेत असते. जीएसटी लागू झाल्यानंतर त्यात अनेक बदल करण्यात येत आहेत. सरसकट सर्व प्रकारच्या फर्नीचरला २८ टक्के जीएसटी लागू केला गेला. पण लाकडी फर्नीचरचं अधिक काम असंघटित क्षेत्रात होतं आणि याचा वापर मध्यमवर्गाकडून केला जातो. याचप्रकारे प्लास्टिक उत्पादनांवरदेखील २८ टक्के जीएसटी लावण्यात आला आहे.