मुंबईच्या महापौरांकडून झोपडवासीयांच्या जागेचा गैरव्यवहार; किरीट सोमय्यांचा आरोप

Kishori Pednekar-Kirit Somaiya.jpg

मुंबई : भाजपचे (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी पुन्हा एकदा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्यावर गंभीर स्वरूपाचा आरोप केला आहे. किशोरी पेडणेकर यांनी मुंबईतील झोपडवासीयांच्या जागेचा गैरव्यवहार केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. तसेच त्यांना ४८ तासांत पदमुक्त करण्याची मागणी केली आहे. पेडणेकर यांच्यावर कारवाई न केल्यास महापालिकेसमोर (BMC) धरणा आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

किरीट सोमय्या म्हणाले की, महापौर किशोरी पेडणेकर यांनी वरळी येथील गोमाता जनता एसआरएच्या जागेचा गैरव्यवहार केला आहे. त्यांच्यावर ताबडतोब कारवाई व्हावी आणि त्यांची हकालपट्टी करावी. याबाबत आम्ही महापालिका आणि एसआरएकडे कारवाईची मागणी केली आहे. पुरावेही सादर केले आहेत. ४८ तासांमध्ये पेडणेकर यांच्यावर कारवाई झाली नाही तर मी महापालिकेसमोर धरण्यावर बसणार आहे. मूळ लाभार्थ्यांना २००६/२००८ मध्ये गोमाता जनता सोसायटीत (गणपतराव कदम मार्ग, वरळी) सदनिका देण्यात आल्या. बिल्डिंग क्रमांक-२ मधील ६०१ हा गाळा अलॉट करण्यात आला होता. त्यात कुठेही मुंबईच्या महापौर किंवा त्यांच्या परिवारांचं नाव नव्हतं. हा गाळा महेश लक्ष्मण नरमुल्ला या लाभार्थ्यांच्या नावाने देण्यात आला आहे.

परंतु, त्या गाळ्यावर गेली ८ ते १० वर्षांपासून महापौर किशोरी पेडणेकरांचा कब्जा आहे. त्यांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात पण आपल्या घराचा पत्ता हाच दिला आहे. येथे याच बिल्डिंग क्र. १ मधील तळमजला, गाळा क्र. ४ ही लाभार्थ्यांना देण्यात आला आहे. परंतु हा गाळा पण किशोरी पेडणकर परिवाराच्या ताब्यात किश कॉपोरेशनचे कार्यालय म्हणून आहे, अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली. महापौरांनी स्वतः स्थापन केलेले किश कॉपोरेट सर्विसेस इंडिया प्रा. लि. कंपनीचे कार्यालय या ठिकाणी आहे. गेल्या आठवड्यात मी स्वत: आणि एसआरए अधिकाऱ्यांनीही येथे भेट दिली. तसेच पाहणी केली. या रहिवासी जागेचा व्यावसायिक कामासाठी उपयोग करण्यात येत आहे. यापैकी बिल्डिंग क्र.१, तळमजला, येथे रहिवासी उपयोगाचे प्रमाणपत्र/परवानगी होती/आहे. त्यावर या सदनिका लाभार्थ्यांना देण्यात आल्या, त्यात कुठेही मुंबईचे महापौर किशोरीताई पेडणेकर किंवा त्यांच्या परिवाराचे नाव नाही, अशी माहिती सोमय्या यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER