मतदार याद्यातील घोळ सुधारा : मुश्रीफ यांची महापालिकेला सूचना

Hasan Mushrif

कोल्हापूर : महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रसिद्ध केलेल्या प्रारुप मतदार यादीतील घोळ दिवसेंदिवस वाढू लागला आहे. एका प्रभागातील नावे दुसऱ्या प्रभागाच्या यादीत मोठया संख्येने समाविष्ठ झाली आहेत. आजी-माजी नगरसेवक, इच्छुक उमेदवार, मतदारांनी मतदार यादीतील घोळावरुन हरकती नोंदविल्या आहेत. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यापर्यंत मतदार यादीतील घोळाचा विषय पोहचताच त्यांनी तत्काळ महापालिकेचे प्रशासक कांदबरी बलकवडे यांना मतदार यादीतील चुका तत्काळ दुरुस्त कराव्यात’अशी सूचना केली आहे. यासंबंधीचे मुश्रीफांचे पत्र राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने सायंकाळी प्रशासक बलकवडे यांना दिले.

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, माजी नगरसेवक उत्तम कोराणे, सरचिटणीस सुनील देसाई, संजय कुराडे आदींनी सोमवारी दुपारी मुश्रीफांची भेट घेतली. शहराध्यक्ष पोवार यांनी मतदार यादीतील घोळ मंत्री मुश्रीफ यांच्यासमोर मांडला. मुश्रीफांनी तत्काळ महापालिका प्रशासक बलकवडे यांना उद्देशून ‘मतदार यादी योग्य पद्धतीने झालेली नाही. तरी तत्काळ योग्य दुरुस्ती करावी.’अशी सूचना केली.

दरम्यान राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष पोवार, स्थायी समितीचे माजी सभापती आदिल फरास, सचिन पाटील, माजी नगरसेवक विनायक फाळके, सरचिटणीस सुनील देसाई, निरंजन कदम, महेंद्र चव्हाण आदींच्या शिष्टमंडळाने सायंकाळी प्रशासक बलकवडे यांची भेट घेतली. मतदार यादीतील घोळ निदर्शनास आणला. मोठया संख्येने नावांची अदलाबदल झाल्याचे सांगितले.मतदार यादीतील घोळ दुरुस्त करण्याची मागणी केली.

प्रशासक बलकवडे यांनी शिष्टमंडळाला, ‘मतदार यादीतील घोळ दुरुस्त करु. यादी अद्ययावत करुनच प्रसिद्ध केली जाईल’ अशी ग्वाही दिली. अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त निखिल मोरे, रविकांत आडसूळ उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER