मनपाची ‘मिशन इंद्रधनुष मोहीम’ प्रगतिपथावर!

Mission Indradhanuns

नागपूर : महापौर दयाशंकर तिवारी आणि मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात ‘मिशन इंद्रधनुष मोहिमे’अंतर्गत नागपूर मनपा क्षेत्रात २२ मार्चपासून लसीकरणाच्या दुसऱ्या फेरीला सुरुवात होणार. या अंतर्गत ० ते २ वर्षे वयोगटातील बालके व गरोदर मातांना लस मोफत देण्यात येईल. लसीकरणाचा पहिला टप्पा २२ फेब्रुवारीपासून सुरू झाला. तो पुढील १५ दिवस सुरू राहील. ही लस नागपूर मनपाच्या सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये देण्यात येणार आहे.

मागील वर्षात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक बालके नियमित लसीकरणापासून वंचित राहिली. त्यामुळे प्रत्येक बालकाला लस मिळावी, यासाठी मनपाद्वारे ही मोहीम दोन टप्प्यांमध्ये सुरू करण्यात आली आहे. दुसरा टप्पा २२ मार्चपासून पुढील १५ दिवस सुरू राहणार आहे.

नियमित लसीकरण व कोरोना लसीकरणाचे दिवस वगळून ही लस ० ते २ वर्षे वयोगटातील बालकांना व गरोदर मातांना देण्यात येईल. या लसीकरणाचा लाभ जवळच्या मनपा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात घेता येईल, असे आवाहन वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर व माता बालसंगोपन नोडल अधिकारी डॉ. वैशाली मोहकर यांनी केले आहे.

दोन  वर्षांखालील बालके व त्यांच्या मातांचा २०२० पर्यंत सात प्रकारच्या रोगांपासून लसीकरणाच्या माध्यमातून बचाव करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने २०१४ साली ‘मिशन इंद्रधनुष’ ही मोहीम सुरू केली. यामध्ये घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, पोलिओ, क्षयरोग, देवी व कावीळ-ब तसेच काही राज्यांमध्ये हिमोफेलिया व इन्फ्लुएंझा (प्रकार ब) या लसींचा समावेश आहे. संपूर्ण लसीकरण म्हणजे किमान ९० टक्के लसीकरणाची पातळी गाठणे अपेक्षित आहे. २००९ मध्ये हे प्रमाण ६१ टक्के, २०१३ मध्ये ६५ टक्के असून २०२० अखेर हे प्रमाण ९० टक्के करावयाचे होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER