बंडखोरी टाळण्यासाठी नाराज ६३ आमदारांना महामंडळाची लॉटरी

Mahavikas Aaghadi

जळगाव : विरोधी पक्षाची सरकारे अस्थिर करण्यासाठी भाजपकडून (BJP) अनेक डावपेच आखले जात आहेत. मध्यप्रदेशातील कॉंग्रेसचे सरकार पाडल्यानंतर त्यांनी राजस्थानकडे लक्ष केंद्रित केले आहे. परंतु तेथे सध्या संभ्रमाचे वातावरण आहे. पण आता महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार (MVA) अस्थिर करण्यासाठी भाजपने हालचाली सुरू केल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही भाजपचा हा डाव उधळून लावण्यासाठी कंबर कसली आहे. इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रातील नाराज आमदारांनी बंडखोरी करण्याचे धाडस करू नये यासाठी राज्यातील महामंडळे, प्राधिकरण अध्यक्षपदाच्या नियुक्‍त्या तातडीने करण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे.

या मंडळांवर नाराज असलेल्या आमदारांना प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती आहे. महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेले शिवसेनेचे ५६, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) ५४ आणि कॉंग्रेस पक्षाचे ४४ आमदार आहेत. याशिवाय आघाडी सरकारला पाठिंबा देणारे काही लहान पक्षांचे तसेच अपक्ष आमदारही आहेत. राज्यात आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यापासून ते लवकरच कोसळणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

विशेषत: भाजपचे नेते अधूनमधून हे सरकार जास्त दिवस चालणार नाही, अशी विधाने करीत असतात. कर्नाटकनंतर भाजपने मध्यप्रदेशातील कॉंग्रेसचे आमदार फोडून त्या ठिकाणी भाजपचे सरकार सत्तेत आणले. त्यानंतर हाच प्रयोग राजस्थानमध्ये कॉंग्रेस सरकार पाडण्यासाठी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात यश आले नाही; पण त्या ठिकाणी अद्यापही राजकीय संभ्रम आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजप प्रयत्न करीत असल्याचे सांगण्यात येत आहे.

 सत्ताधारी गटाच्या मंत्र्यांनीही भाजपचा हा डाव उधळून लावण्यासाठी नाराज आमदार भाजपच्या गळाला लागू नये, यासाठी महाविकास आघाडीतील तीनही मोठ्या पक्षांचे  नेते काळजी घेत आहेत. आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी आता लवकरच राज्यातील महामंडळावर त्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. महामंडळे, मंडळे तसेच प्राधिकरण अध्यक्षपदास कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा आहे.

त्यामुळे या नियुक्‍त्या घोषित केल्यानंतर शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी व पाठिंबा  देणाऱ्या लहान पक्ष आणि अपक्षांसह एकूण साधारण ६३ आमदारांच्या नियुक्‍त्या होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सत्ताधारी गटातील बहुतांश आमदारांची नाराजी कमी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यात तीन पक्षांसह काही लहान घटक पक्षांच्या  पाठिंब्याचे सरकार असल्यामुळे अनेक आमदारांना सत्तेत संधी हवी आहे.

त्यामुळे आता महामंडळावर सत्ताधारी महाविकास आघाडीतील आमदारांच्या नेमणुका होणार आहेत. याबाबतचा निर्णय तीनही पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीत झाला असून या नियुक्‍त्या लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

ही बातमी पण वाचा : अशोक चव्हाणांना हटवा; मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौऱ्याला मराठा समन्वय समितीचा विरोध

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER