औषधांचा पुरवठा करा; अन्यथा… डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला इशारा

coronavirus-us-president-trump-on-supply-of-hydroxychloroquine to pm-modi

नवी दिल्ली : ‘कोरोना व्हायरस’च्या रुग्णांवरील उपचारांमध्ये वापरले जाणारे मलेरियावरील औषध ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्विन’च्या निर्यातीवरील बंदी भारताने उठवली नाही तर प्रत्युत्तर देण्याचा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिला आहे. भारताशी चांगले संबंध असले तरी ट्रम्प यांनी अशा प्रकारची भाषा वापरल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताकडे हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधाचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे की, “मी रविवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. तुम्ही आम्हाला हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधाचा पुरवठा करत आहात. हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या निर्यातीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंदी घातली आहे. तुम्ही काही प्रत्युत्तराचा विचार करताय का? औषध पुरवठा केला नसता तरी काही हरकत नव्हती. पण मग आम्हीही जशास तसं उत्तर दिलं असतं, आणि ते आम्ही का करू नये.”