शरद पवारांचे पंतप्रधान मोदींना पत्र, व्यक्त केली चिंता

pm modi and sharad pawar

मुंबई : कोरोनाशी लढण्यासाठी, या साथीच्या आजाराला देशातून हद्दपार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशभरात लॉकडाउन जाहीर केलं आहे. यामुळे देशभरातील कृषी क्षेत्रावर परिणाम झाला असून मजूर, शेतीविषयक साधने व इतर संसाधनांच्या अनुपलब्धतेमुळे संपूर्ण कृषी कार्यात अडथळा निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी यासंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे.

या पत्रात शरद पवार यांनी लिहीले –

भारतातील काही भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. शेतकर्‍यांची परतफेड करण्याची क्षमता पूर्णपणे बिघडली असल्याचं सांगितलं आहे. अशा संकटकाळात केंद्र सरकारने हस्तक्षेप करत त्यांचे दुःख कमी करण्यासाठी आणि त्वरित दिलासा मिळावा यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. दरम्यान या पत्रात परिणामांचा प्रभाव कमी करण्यासाठी काही उपायही शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना सुचविले आहेत.

आज सकाळी जनतेशी संवाद साधताना शरद पवार यांनी सर्वांनी कोरोनाविरोधात एकत्र लढा दिला पाहिजे असं आवाहन केलं होतं. “राज्य सरकार, केंद्र सरकार, राष्ट्रीय संघटना, आंतरराष्ट्रीय संघटना यांनी काही निर्णय तातडीने घेतले आहेत. करोनाचं संकट लक्षात घेऊन आपण हे सगळं करतो आहोत हे प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे. कोरोनाचं संकट अत्यंत गंभीर आहे हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवं, देशातील अर्थव्यवस्थेवर याचा गंभीर आणि दीर्घकालीन परिणाम होणार आहे यात काहीही शंका नाही,” असंही शरद पवार यांनी म्हटलं. मात्र सध्याच्या परिस्थितीत सर्वांनी सरकारने दिलेल्या सूचनांचं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे असं आवाहन शरद पवार यांनी केलं.

कोरोनाचे संकट याआधी आलेल्या संकटांपेक्षा अधिक भयंकर; सगळ्यांनी एकत्रित लढा द्यावा – शरद पवार