फक्त पाच मिनिटात कळेल तुम्हाला कोरोना झाला की नाही; पंतप्रधानांनी दिली रॅपिड टेस्टसाठी परवानगी

PM Modi efforts to tackle Coronavirus

मुंबई : कोरोनाच्या लढ्यात भारतीय सरकारी यंत्रणा युद्धस्तरावर प्रयत्न करत आहेत. प्रत्येक पावलावर भारत सरकार कोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्यासाठी वेगाने धाडसी प्रयोग करताना दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारला केंद्र सरकारकडून रॅपिड टेस्टसाठी परवानगी मिळाली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व राज्याचे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्याला रॅपिड टेस्टसाठी परवानगी दिली असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. यामुळे एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे की नाही याची माहिती आता पाच मिनिटात मिळणार आहे.

राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “ कोरोनाचं टेस्टिंग वाढवलं पाहिजे अशी अपेक्षा नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. पाच हजार चाचण्या करण्याची आपल्या राज्याची क्षमता आहे. आपल्याला याआधी रॅपिड टेस्टसाठी परवानगी मिळाली नव्हती. मात्र आता ती मिळाली आहे. रॅपिड टेस्टच्या माध्यमातून प्राथमिक चाचणी म्हणजेच स्क्रिनिंग केल्याने एखाद्याला कोरोनाची लागण झाली आहे की नाही हे पाच मिनिटात कळणार. रॅपिड टेस्टमुळे कोरोनाची लागण झाली आहे का हे रक्ताचा नमुना घेतल्यानंतर पाच मिनिटांत स्पष्ट होईल. शरिरात तयार झालेल्या रोगप्रतिकारकांच्या प्रमाणावरुन हे निश्चित केलं जाईल”. यामुळे आपल्याला कोरोनाची लागण झालेल्यांच्या संख्येचा अंदाज आला तर त्यांना तात्काळ त्यांचं विलगीकरण करत उपचार केले जातील अशी माहिती राजेश टोपे यांनी यावेळी दिली.

कोरोनाग्रस्तांसाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र रुग्णालय –

“प्रत्येक जिल्ह्यात कोरोनासाठी स्वतंत्र रुग्णालय देण्याचा निर्णयदेखील घेतला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ते म्हणाले यासाठी अमबजावणीदेखील सुरु आहे.

फक्त कोरोना रुग्णांसाठी वेगळी रुग्णालयं असावीत असा आग्रह नरेंद्र मोदींनी धरला आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्राने आधीच तयारी केली आहे,” अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी चांगल्या दर्जाची साधनं उपलब्ध करुन देण्याची विनंती यावेळी करण्यात आल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं.