गोवा ठरले कोरोनाला हरवणारे देशातील एकमेव राज्य !

Corona Virus - Pramod Sawant

पणजी : देशातून कोरोनाचं संकट दूर घालवण्यासाठी शासकीय यंत्रणा जमेल त्या उपाययोजना करत आहेत. अशातच गोवा या राज्याने कोरोनावर मात केली आहे. रविवारी गोव्यातील सर्व रुग्णांवर केलेल्या चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसंच ३ एप्रिलनंतर राज्यात एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नाही. त्यामुळे गोवा कोरोनामुक्त झाल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही दिलासादायक माहिती ट्विटरवरून दिली आहे. ‘समाधान आणि सुटकेची गोष्ट म्हणजे, गोव्यातील शेवटचा कोरोनाबाधित रुग्णाचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. डॉक्टर आणि स्पोर्ट स्टाफचं यासाठी नक्कीच कौतुक करायला हवं. गोव्यात ३ एप्रिलनंतर कोणताही नवा कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही, असे ट्विट सावंत यांनी केले आहे.

गोवा हे छोटे राज्य असले तरी येथे दाखल होणाऱ्या पर्यटकांची गर्दी मोठी आहे. पोलीस, स्थानिक पर्यटन विभाग आदींकडून चांगलं सहकार्य मिळालं. नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सूचना अमलात आणली. तसंच अनेक सणांच्यावेळीदेखील इथल्या कोणत्याही धर्मातील नागरिकांकडून कुठलीच नवी समस्या निर्माण झाली नाही. दरम्यान, नियमानुसार गोव्याला काही सूट मिळू शकते का, यावर आपण विचार करत असल्याचं प्रमोद सावंत म्हणाले. गोवा हे राज्य कोरोनामुक्त झालं असून प्रत्येकासाठीच ही दिलासादायक बाब आहे. गोव्यासारखंच देशातील प्रत्येक राज्य कोरोनामुक्त व्हावं, अशी सर्वांचीच इच्छा आहे.