पंतप्रधान गरीब कल्याण योजनेद्वारे मिळणारे पैसे महिलांच्या खात्यात जमा

पंतप्रधान गरीब कल्याण योजना

नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच ठप्प पडले असल्यामुळे देशातील गरीब जनतेला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने महिलांच्या जनधन बँक खात्यात पैसे जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता महिलांच्या जनधन बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. बिहारमधील समस्तीपूर येथील जनधन बँक खातेधारक महिलांनी केंद्र सरकारकडून मिळालेले पैसे काढण्यास गेल्या असता, पैसे हातात मिळाल्यानंतरचा त्यांच्या चेह-यावरचा आनंद टिपण्यासारखा होता.

लॉकडाऊननंतर चित्रपटगृहांमध्येही पाळणार सोशल डिस्टन्सिंग; करणार ‘हे’ बदल

समस्तीपूरमध्ये खाते नंबरच्या शेवटच्या अंकानुसार जनधनशी संबंधित महिलांच्या मोबाईलवर पंतप्रधान गरीब कल्याण योजनेद्वारे मिळणारे ५०० रुपये जमा होत आहेत. लॉकडाऊननंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक महिलेच्या जनधन बँक खात्यात दरमहिना ५०० रुपये जमा होत आहेत.

ही प्रक्रिया तीन महिन्यांपर्यंत चालू राहील. म्हणजेच, केंद्र सरकार महिलांच्या बँक खात्यात तीन महिन्यांत १५०० रुपये जमा करणार आहे. एकूण जनधन खात्यांपैकी ५३ टक्के महिलांच्या नावे आहे. त्यानुसार, जवळपास २० कोटी महिलांना याचा फायदा होणार आहे.

याचबरोबर, सोशल डिस्टन्सिंग लक्षात घेऊन सर्वांच्या खात्यात एकाच वेळी पैसे जमा करण्यात येत नाहीत. ज्या महिलांच्या जनधन बँक खाते क्रमांकातील शेवटचा अंक ०-१ आहे, त्यांच्या खात्यात ३ एप्रिलला आणि २-३ अंक असणाऱ्या खातेधारकांच्या बँक खात्यात ४ एप्रिलला पैसे जमा झाले आहेत. तसेच, ज्या लाभार्थ्यांचा खाते क्रमांक ४-५ आहे, त्यांच्या खात्यात ७ एप्रिलला आणि ६-७ क्रमांकाच्या खात्यात ८ एप्रिल आणि ८-९ क्रमांक येणाऱ्या खातेधारकांच्या बँक खात्यात ९ एप्रिलला पैसे जमा होणार आहेत. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेद्वारे १.७० लाख कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.