शिवसेना नगरसेवकाचा घरचा आहेर; खासगी रुग्णालयावर प्रशासनाचे नियंत्रण नाही

नगरसेवक महेश गायकवाड

मुंबई : राज्यात कोरोनचे (Corona) संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.खासगी रुग्णालयाच्या मनमानी कारभारामुळे अनेक रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे . या गंभीर परिस्थितीत कल्याण डोंबिवलीतही परिस्थिती बिकट आहे. याठिकाणी मंगळवारपर्यंत ३२ हजार कोरोनाबाधित होते. दिवसाला ४०० ते ४५० आसपास रुग्ण आढळत आहेत.

कोरोना महामारीच्या काळात रुग्णांना योग्य आणि वेळेत उपचार मिळण्यासाठी शासनाने आणि महापालिकांनी खासगी रुग्णालये ताब्यात घेतली. परंतु त्या खासगी रुग्णालयावर नियंत्रण ठेवण्यात प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहेत असे म्हणावे की खासगी हॉस्पिटल चालवणाऱ्या मालकांची मुजोरी वाढली आहे? असा सवाल शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांनी केला आहे.

गायकवाड म्हणाले की, मयताच्या टाळूवरचे लोणी खाण्यात अधिकारी स्वतःला धन्य मानत आहेत, म्हणून रुग्णाच्या होणाऱ्या लुटमारीवर महापालिका अधिकारी डोळेझाक करीत आहेत. रुग्णाच्या मृत्यूला डॉक्टरांना जबाबदार मानावे की महापालिका अधिकाऱ्यांना? असाच एक प्रकार माझ्या समोर आला. कल्याण पूर्व आनंदवाडीत असलेल्या साई स्वस्तिक नावाच्या खासगी रुग्णालयात गेल्या ११ दिवसांपासून एक महिला कोरोना या आजारावर उपचार घेत होती,त्याचे जवळपास ४ लाखाच्या घरात बिल झाले, परंतु तिची तब्येत खालावल्यामुळे तिला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जबरदस्तीने हलवण्यात सांगितले. शिफ्ट करण्याच्या दरम्यान तिचा मृत्यू झाला असे त्यांनी सांगितले.

नातेवाईकांनी घडलेला प्रकार शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांच्या कानावर घातला असता त्यांनी थेट रुग्णालय गाठले व तेथील हजर असणाऱ्या व्यवस्थापनाला जाब विचारण्याचा प्रयत्न केला ,परंतु कोणीही सकारात्मक उत्तरे दिली नाहीत. तिथे गेल्यानंतर अजून काही बाबी समोर आल्या, त्या म्हणजे या हॉस्पिटलमध्ये मृत पावणाऱ्या रुग्णाला देण्यात येणाऱ्या मृत्यूपत्रात गैरप्रकार चालू असल्याचं निदर्शनास आले. हॉस्पिटल ICU रूममध्ये ज्या खाटा ठेवण्यात आल्यात त्या दुय्यम दर्जाच्या खाटा असल्याच्या निदर्शनात आल्या. स्थानिक लोकांच्या सांगण्यानुसार या हॉस्पिटलमध्ये येथील कर्मचारी दारू पीत असल्याचे कळाले, याखेरीज आज जशी हॉस्पिटलच्या निष्काळजी पणामुळे महिला मृत पावली तसेच अजूनही ३ ते ४ रुग्ण या हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे मृत पावल्याचा आरोप महेश गायकवाड यांनी केला आहे .

 


 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER