कोरोनाचा वाढतोय धोका

badgeकोरोना विषाणूच्या साथीला रोखण्यासाठी सारा देश भिडला आहे. तरीही दररोज सात-आठ रुग्णांची भर पडते आहे. आज एकट्या मुंबईत चार नवे रुग्ण निघाले. आज एकट्या मुंबईत कोरोनाचे एकूण ४५ रुग्ण आहेत. राज्यात हा आकडा ११६वर पोचला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येत्या ३१ तारखेपर्यंत महाराष्ट्र ‘लॉकडाऊन’ केला असताना संशयित रुग्णांची वाढती शंका निश्चितच चिंता वाढवणारी आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काही संकेत मिळाले असतील म्हणूनच त्यांनी धक्कातंत्र वापरत काल रात्री तीन आठवडे संपूर्ण देश ‘लॉंक डाऊन’ केला. मोदींनी लक्ष घातले म्हणजे आता सारे बंद होणार ह्या भीतीने मुंबई, पुणे. नाशिक ह्या शहरांमध्ये लोकांनी रात्री दुकाने उघडायला लावून जबरदस्त खरेदी केली. जीवनावश्यक वस्तूंचा भरपूर साठा आहे असे सरकार वारंवार सांगत असताना लोक साठा करून ठेवत आहेत. घरातच राहा, गर्दी टाळा असे बजावूनही लोक कोरोनाला गांभीर्याने घ्यायला तयार नाहीत असे दिसते. हेच चित्र राहिले तर याची मोठी किंमत राज्याला मोजावी लागेल.

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला रुग्ण ३० जानेवारीला मिळाला. १३ मार्चला आपल्याकडे कोरोनाची शंभरावी केस झाली. जगामध्ये १३ देश असे आहेत की, जिथे १०० व्या केसनंतर रुग्णांचा आकडा सातत्याने वाढतो आहे. ह्या १३ देशांमध्ये आपण एक आहोत. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि मोदी यांची चिंता समजू शकते. मोदींना हे महायुध्द वाटते. त्यामुळे त्यांनी त्या दिशेने तयारी सुरू केली आहे. १३५ कोटी लोकसंख्येचा देश एका फटक्यात ‘बंद’ केला जातो म्हणजे काही मोठे संकट घोंगावते आहे. पण लोक हे समजून घ्यायला कितपत तयार आहेत? अजूनही लोक झुंडीने बाहेर पडत आहेत. १०० वर्षातील आजाराची ही सर्वात मोठी साथ आहे. तिच्यावर औषध नाही. संसर्ग वाढला तर काही दिवसात हॉस्पिटल्स ओव्हरफ्लो होतील. चीन, इटलीने सुरुवातीला मस्ती केली. त्याची शिक्षा त्यांना भोगावी लागली. अवघी सहा कोटी लोकसंख्या असलेल्या इटलीमध्ये भयंकर स्थिती आहे. हॉस्पिटल्समध्ये रुग्ण ठेवायला जागा नाही. ६० वर्षावरच्या रुग्णांना मरू दिले जात असल्याच्या बातम्या आहेत. आपल्याकडे ही पाळी येऊ द्यायची नसेल तर प्रत्येकाला गंभीर व्हावे लागेल.

आपण सध्या किती गंभीर अवस्थेत आहोत याची लोकांना कल्पना नसेल. किंवा असली तरी ‘मला काही होणार नाही’ अशा भ्रमात असतील. पण कोरोना गरीब-श्रीमंत असा फरक करीत नसतो. आज ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स ‘पॉझिटीव’ निघाले. उद्या आपणही असू शकतो. म्हणून काळजी घ्या. घाबरू नका म्हणण्याचे दिवस संपले. आपला ‘इटली’ होऊ द्यायचा नसेल तर घाबरलेच पाहिजे. सरकार सांगते त्या सूचना पाळल्या पाहिजेत. शक्यतो घराबाहेर पडू नका. पडायचे असेल तर एकट्याने निघा. दोन माणसांमध्ये तीन फुटाचे अंतर ठेवा. ही लढाई वेगळी आहे. समोर शत्रू दिसत नाही. म्हणून खूपच सावध राहायचे आहे.