करोनाची बाधा मामाच्या खाऊला नाही…

करोनाची बाधा मामाच्या खाऊला नाही...

अक्षय्य तृतीया….साडेतीन मुहुर्तांपैकी एक. कोकणातल्या लोकांना माहीत आहे की आंबे खायची सुरुवात अनेक जण या दिवशी करतात आणि अनेक व्यापारी सोनं खरेदी करून शुभमुहूर्त साधतात. भरभराट कायम राहील, अशी अपेक्षा करतात.

पुण्यामधे गणेश मंडळांचं मोठं नेटवर्क आहे आणि गेल्या पंचवीस तीस वर्षात शहर आणि जिल्हा जोडला जाऊ लागलाय तसं सामाजिक उपक्रमांचे वेगवेगळे आविष्कार वाढत्या समस्यांबरोबरच दिसू लागलेत. संगणक आले पण त्यावर कुंडलीही मांडली जाऊ लागली. तसंच विज्ञान कितीही पुढं जात राहिलं तरी मानवी अपप्रवृत्ती, समस्या त्याही मानवनिर्मित कमी झालेल्या नाहीत. त्यामुळंच मग आपल्याला मिळत असलेला आनंद वंचितांनाही मिळाला तर…हा विचार करून एका गणेश मंडळानं वंचित मुलांसाठी मामाच्या गावची सफर असा उपक्रम सुरू केलाय.

पुण्यातल्या शुक्रवार पेठेत शिवाजी रस्त्यालगत असलेल्या या मंडळाचे सामाजिक भान असलेले अध्यक्ष शिरीष मोहिते यांनी हा उपक्रम २१ वर्षांपूर्वी सुरू केला. उन्हाळ्याच्या सुटीत आजोळी जायचं, मजा करायची ही चैन वंचित मुलांना परवडत नाही किंबहुना अशी चैन करण्यापासूनही ते वंचितच राहतात. म्हणूनच मग अक्षय्य तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी पुण्यातल्या अशा तीन चार संस्थांमधली मुलं घेऊन यायचं आणि त्यांना आपल्या मंडळाच्या वतीनं मामाच्या गावच्या सफरीचा अनुभव द्यायचा. तोही मंडळाच्या परिसरातच.

शंभर दीडशे मुलांसाठी हत्ती, घोडे, उंटावरून रपेट मारणं असो की जादूचे प्रयोग असोत, बॅण्ड-स्पीकर-विविध गुणदर्शन कलावंतांचे कार्यक्रम, गाण्याचा कार्यक्रम, पंचपक्वान्नांचे जेवण आणि हे सारं पन्नास शंभर मामा-मावश्यांच्या साक्षीनं, सहभागानं. हे सारंच अनुभवताना मुलं खूप धमाल करतात, एन्जॉय करतात, हे सेवा मित्र मंडळाचं संचित असतं.

करोनाग्रस्ततेमुळं पुण्यात संचारबंदी, मग अशा वेळी मामाच्या गावची सफर होणं, अनेक मुलं एकत्र येणं शक्य नाही. मग करायचं काय…तर सेवा मित्र मंडळानं मुलांसाठी खाऊ गोळा केला आणि तो मुलांपर्यंत पोचवलाय. माहेर, बचपन बचाओ वर्ल्ड फोरम, संतुलन पाषाण शाळा, सेवाधाम, एकलव्य आणि आपलं घर या सहा संस्थांमधल्या साडेचारशे भाच्यांसाठी आमरस, लाडू, भेळ, बेकरी आयटेम्स, चॉकलेट्स, फळं, आंबे कलिंगड टरबूज, सात प्रकारची कडधान्यं पोहे, विविध प्रकारची बिस्किटं असा सगळा खाऊ सेवा मित्र मंडळानं पोचता केलाय.

सामाजिक रचनेत कुठे जन्म घ्यावा, हे कुठल्याच व्यक्तीच्या हातात नसतं. त्यामुळंच विविध कारणांनी अशा संस्थांमधे राहून भवितव्य घडवण्याचं आव्हान अनेक मुलांपुढे उभं राहतं. त्यातून अनेक मुलं भविष्य घडवून समाजापुढे आदर्शही निर्माण करतात पण अशा प्रतिकूल परिस्थितीत झगडताना, जीवनसंघर्षाला सामोरं जाताना सेवा मित्र मंडळासारखी मंडळं या सर्व भाचेमंडळींच्या जीवनात किमान वर्षातून एकदा मामाच्या गावची वाट पाहण्याची संधी देतात, त्यांची उन्हाळ्याची सुटी कारणी लावतात, हे आशादायक वास्तव आहे. एकीकडं करोनामुळं जीवनाचं, संपत्तीचं, संचिताचं क्षणभंगुरत्व ध्यानात येत असताना सेवा मित्र मंडळ ज्यांना कुणी नाही त्यांच्या जीवनात अक्षय्य आनंद निर्माण करतंय आणि त्यामुळंच पुण्याचा लौकिक इतरांना दिशा दाखवणारं शहर असा कायम राखण्यातही योगदान देतंय. म्हणूनच आता या मुलांच्या जीवनात खाऊचा आनंद आलाय तसा आपणा सर्वांच्या जीवनात करोनामुक्तीचा आनंद लवकर येवो, हीच शुभेच्छा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला