कोरोनाचा फटका – देशाप्रमाणेच राज्याच्या अर्थव्यवस्थेतही ८ टक्क्यांनी घट

Corona
  • स्थूल उत्पन्न १ लाख ५६ हजार कोटींनी घटले
  • उद्योग क्षेत्रात ११.३ टक्के, सेवा क्षेत्रात ९ टक्क्यांनी घट
  • कृषी क्षेत्रात ११.७ टक्क्यांनी वाढ

मुंबई : मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान महाराष्ट्रात दाखल झालेल्या कोरोनाचा जबरदस्त फटका राज्याच्या अर्थव्यवस्थेला बसला आहे. चालू अर्थसंकल्पीय अधिवेशात सादर झालेल्या आर्थिक पाहणी अहवालात याचे प्रतिबिंब उमटले. देशाप्रमाणेच राज्याच्या अर्थव्यवस्थेतही ८ टक्क्यांनी घट झाली असून स्थूल उत्पन्न मागील आर्थिक वर्षापेक्षा १ लाख ५६ हजार ९२५ कोटींनी घटले आहे. कोरोनाचा फटका उद्योग आणि सेवा क्षेत्रालाही बसला असून उद्योगात ११.३ टक्क्यांनी तर सेवा क्षेत्रात ९ टक्क्यांनी घट झाली आहे. यंदा मान्सून चांगला झाल्याने कृषि क्षेत्रात मात्र ११.७ टक्क्यांनी वाढ झाल्याची दिलासादायक बाब या कोरोना काळातही घडली आहे.

विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या पटलावर आज आर्थिक पाहणी अहवाल मांडण्यात आला. कोरोना महामारीचे गंभीर परिणाम राज्याच्या अर्थव्यवस्थेवर दिसत असून दरडोई उत्पन्न जे मागील वर्षी २ लाख २ हजार १३० कोटी होते ते उत्पन्न या आर्थिक वर्षात १ लाख ८८ हजार ७८४ कोटींपर्यंत खाली घसरले आहे. याचा फटका निर्मिती क्षेत्राला व बांधकाम क्षेत्रालाही बसला आहे. निर्मिती क्षेत्रात ११. ८ टक्के तर बांधकाम क्षेत्रात १४.६ टक्के घट झाली आहे. कृषी क्षेत्रात दिलासादायक बाब घडली असतानाच पशुसंवर्धन, वने व लाकूडतोडणी आणि मत्स्यव्यवसाय व मत्स्यशेती या क्षेत्रांमध्ये अनुक्रमे ४.४ टक्के, ५.७ टक्के व २.६ टक्के वाढ झाली आहे.

मॅग्नेटिक महाराष्ट्रात १ कोटी १३ लाख गुंतवणूक अडीच लाख रोजगार या आर्थिक पाहणी अहवालानुसार एप्रिल २००० ते सप्टेंबर २०२० पर्यंत देशात थेट परदेशी गुंतवणूक ८ लाख १८ हजार ५२२ कोटी रूपये असून ती २७.७ टक्के होती. सन २०२०-२१ मध्ये सप्टेंबर पर्यंत २७ हजार १४३ कोटी रूपयांची थेट परदेशी गुंतवणुकीची भर पडली आहे. त्यात मँग्नेटिक महाराष्ट्र २.० अंतर्गत २०२० मध्ये १.१३ लाख कोटांची गुंतवणूक झाली असून त्यात २.५० लाखापेक्षा जास्त रोजगार निर्माण होणार आहेत.

शिवभोजनच्या २ कोटी ८१ लाख थाळ्यांचे वाटप अहवालात नमूद करण्यात आले आहे की, मार्च २०२१ अखेर शिवभोजन थाळीची किंमत १० रुपयांवरून पाच रूपये करण्यात आली. ९०६ शिवभोजन केंद्रामधून डिसेंबर २०२० पर्यंत २ कोटी ८१ लाख शिवभोजन थाळ्यांचे वितरण करण्यात आले. या शिवाय प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतूनहीं धान्य वाटप करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

आरोग्यासाठी ७४४ कोटी ६५ लाख रूपये खर्च

या शिवाय कोरोनाकाळात राज्य सरकारने केलेल्या उपाययोजनांवर करण्यात आलेल्या खर्चाचा तपशीलदेखील या आर्थिक पाहणी अहवालात नमूद करण्यात आला आहे. त्यानुसार महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत सन २०२०-२१ मध्ये डिसेंबर अखेर ४ लाख ५४ हजार रुग्णांवर शस्त्रक्रिया तसेच उपचार करण्यात आले. त्यापोटी ७४४ कोटी ६५ लाख रूपये खर्च करण्यात आले. या अहवालानुसार कोरोनामध्ये १५ जानेवारी अखेर १९.८४ लाख रुग्णांपैकी १८.८१लाख रूग्ण बरे झाले आहेत. रूग्ण बरे होण्याचा दर ९४. ८टक्के होता. तर एकूण मृत्यू ५०,३३६ होते. रुग्ण मृत्यूदर २.५ टक्के होता. तर प्रति लाख लोकसंख्येमागे रूग्णसंख्या १५,६४९ होती. याकाळात राज्यात १.३७ कोटी चाचण्या करण्यात आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

  • – हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग या आठ पदरी महामार्गासाठी डिसेंबर २०२० पर्यंत ९२.३ टक्के जमिनीचे भूसंपादन झाले आहे.
  • मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाचे डिसेंबर २०२० अखेर २० टक्के काम पूर्ण
  • मुंबई मेट्रो रेल प्रकल्पाचे दहिसर-चारकोप-वांद्रे-मानखुर्द, कुलाबा-वांद्रे-सिप्झ, वडाळा-कासारवडवली-गायमुख, ठाणे-भिवंडी-कल्याण, स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी व अंधेरी ते दहिसर-मीरा भाईंदरची कामे प्रगतीपथावर
  • कोरोना काळात महाराष्ट्र देशातील सर्वाधिक इंटरनेट युजर असलेले राज्य बनले आहे. २०२० अखेर इंटरनेट ग्राहकांची संख्या ९.७ कोटी असून ती देशातील राज्यांमध्ये सर्वाधिक आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER