कोरोनामुळे साखर कारखान्यांची जबाबदारी वाढणार

Sugar

कोल्हापूर : यंदाचा ऊस गाळप हंगाम ऑक्टोबर महिन्यापासून सुरू करण्याबाबत नियोजन सुरु आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर साखर कारखान्यांनी कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी, याचा आराखडा साखर आयुक्तालयाकडून तयार करण्यात येत आहे. त्यानुसार ऊस तोडणी कामगारांची आरोग्य तपासणी, सॅनिटायझर, मास्क, गरज भासल्यास योग्य तो औषधोपचार करण्याची जबाबदारी साखर कारखान्यांवर सोपवण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. त्यामुळे आर्थिक देणी, अतिरिक्त ऊस यासह आर्थिक विवंचनेत असणाऱ्या कारखान्यांची यंदा जबादारीत वाढ होणार आहे.

यंदाच्या ऊस गाळप हंगाम राज्यातील सुमारे १८० कारखाने गाळप करतील असा प्राथमिक अंदाज आहे. प्रत्येक कारखान्यात सरासरी तीन ते पाच हजार इतक्या संख्येने ऊस तोडणी मजूर येत असतात. या सर्व मजुरांच्या आरोग्याची देखभाल आता साखर कारखान्यांना करावी लागणार आहे.

कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर आणि अहमदनगर या ऊस पट्ट्यातील प्रत्येक जिल्ह्यात सुमारे सव्वा लाख कामगार ऊस तोडणीसाठी परजिल्ह्यातून येतील. ऊस तोडणी कामगारांच्या आरोग्याची जबाबदारी साखर कारखान्यांवर सोपविण्यात येईल. त्यानुसार कामगारांना मास्क आणि सॅनिटायझर पुरवणे, त्यांची नियमित आरोग्य तपासणी करणे, औषधोपचार करण्याच्या सूचना कारखान्यांना दिल्या आहेत. प्रत्येक कामगाराला प्रत्येकी किमान दोन मास्क, साबण आणि सॅनिटायझर कारखान्यांकडून द्यावे लागणार आहे. ऊस तोडणी कामगार यासर्वांचा वापर करतात की नाही याची तपासणी कारखान्यांना करावी लागेल. यातूनही तोडणी कामगारांना करोनाची लक्षणे आढळल्यास त्यांच्यावर उपचार आणि विलगीकरणाची व्यवस्था कारखान्यांनी करावी, कामगारांवर योग्य आणि जलद उपचाराची सोय कारखान्यांना करावी लागणार आहे.

ऊस तोडणी कामगारांनी यंदाच्या हंगामात लहान मुलांना बरोबर आणू नये, साठ वर्षावरील कामगारांना घेवू नये, असे आवाहन करण्यात येणार आहे. मात्र, अनेक कुटुंबांमध्ये लहान मुलांना मूळ गावी ठेवण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे लहान मुलांसाठी पाळणाघर आणि शालेय मुलांसाठी साखर शाळा या व्यवस्था करावी लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER