
राज्यात मिशन बिगिन अगेनमधे विविध क्षेत्रांत अनलॉकपर्व सुरू झाले. जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत दैनंदिन व्यवहार पूर्वपदावर आले. कोरोनाचा जोर ओसरू लागला आणि त्यामुळेच मुळात शिस्तप्रिय असलेली जनता वारं प्यायलेल्या वासरासारखी हुंदडू लागली आणि कोरोना विषाणूचा फैलाव पुन्हा एकदा दिसून आलाय. मुंबईत १ फेब्रुवारीपासून लोकाग्रहास्तव उपनगरी रेल्वेगाड्या म्हणजेच लोकलची सेवा विवक्षित कालावधीसाठी सुरू करण्यात आली आणि लोकलमध्ये कोरोनापूर्व काळासारखी झुंबड उडाली, तीही कोणतीही कोरोना पूर्वसुरक्षा काळजी न करता. त्यातूनच मग मुंबईत आणि अत्युत्साह दाखवणाऱ्या पुण्यातही कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा वेगाने वाढलेत. त्यातूनच मग उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने कडक पावले उचलावी लागतील, अशा शब्दात जनतेला दम भरावा लागला आहे.
एक वेळ कोरोना परवडला; पण गुन्हेगारी वाढता कामा नये, असं वाटतं. कारण कोरोना (Corona) आज ना उद्या नक्कीच जाणार आहे; पण वाढती गुन्हेगारी ही पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरासाठी विद्येच्या माहेरघरासाठी ठसठसती कधीही बरी न होणारी जखम ठरणार आहे. हे वाटण्याचं कारण म्हणजे कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याच्या बातमीबरोबरच कुख्यात गुंड गजा मारणेच्या तुरुंगातून सुटकेची आणि तुरुंगातून सुटल्यासुटल्या त्याच्या समर्थकांसह त्यानं टोलनाक्यावर घातलेल्या गोंधळाची, धुडगुसाची. त्यातूनच तुरुंगातून सुटल्यासुटल्या त्याच्यावर पुन्हा एकदा गुन्हा दाखल झाल्याची बातमी आलीय.
वास्तविक, दोन खुनांच्या गुन्ह्यातून कुख्यात गुंड गजा मारणेची सुटका झाली आहे. पप्पू गावडे आणि अमोल बधे या दोघांच्या खूनप्रकरणात गजा मारणे आणि त्याच्या समर्थकांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारीविरोधी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आणि त्यांना मोक्का लावण्यात आला होता. सुरुवातीला येरवड्याच्या कारागृहात ठेवण्यात आल्यानंतर त्याला कोल्हापूरला हलवण्यात आले होते आणि नंतर तळोजाच्या तुरुंगात ठेवण्यात आले होते. खुनाच्या गुन्ह्यातून सुटका झाल्यानं गजा मारणे याला तळोजा तुरुंगातून सोडण्यात आलं.
तुरुंगाबाहेर त्याच्या स्वागतासाठी पाचशेहून जास्ती चारचाकी गाड्या घेऊन काही हजार समर्थक जमले होते. त्याच्या सुटकेनंतर ‘किंग ऑफ महाराष्ट्र’ असा त्याचा उल्लेख केलेले स्टेटसही सोशल मीडियावरून टाकले गेले होते. गजा मारणेच्या समर्थकांना तो किंग ऑफ महाराष्ट्र वाटतही असेल; पण रस्त्याने विशेषतः मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाने इतक्या सगळ्या चारचाकी गाड्या घेऊन जाताना या लोकांनी धुडगूस घातला आणि त्याची मिरवणूक काढली. कोरोनाच्या काळात एखाद्या विवाह समारंभालाही पोलिसांची परवानगी घ्या, दोन्हीकडे मिळून शंभरच लोक बोलवा, असे निर्बंध घालण्यात आले होते; पण गजा मारणे नावाच्या लोकोत्तर पुरुषाच्या स्वागतासाठी जमलेल्या त्याच्याइतक्याच नामचिन लोकांनी सोमवारी संध्याकाळी उर्से टोलनाक्यापर्यंत त्याची मिरवणूक काढली.
उर्से टोलनाक्यावर टोल न भरताच या गाड्या वेगाने पुण्याकडे रवाना झाल्या, असं दैनिक लोकमतच्या इंटरनेट आवृत्तीत नमूद करण्यात आलंय. गेल्याच महिन्यात शरद मोहोळ तुरुंगाबाहेर पडला असून इतरही काही गुंड सध्या तुरुंगाबाहेर आलेले आहेत. त्यामुळे पुण्यात आता टोळ्यांचे वर्चस्वयुद्ध किंवा गँगवॉर पुन्हा सुरू होणार की काय, अशी भीती या वृत्तात व्यक्त केली गेली आहे.
पालकमंत्री अजित पवार यांनी कोरोना रुग्ण वाढल्यानंतर कडक उपाय करू, असा सज्जड दम सर्वसामान्य नागरिकांना दिलाय. पण आपल्या कडक स्वभावासाठी प्रसिद्ध असलेले पालकमंत्री आता टोलनाक्यावर धुडगूस घालणाऱ्या गजा मारणे समर्थकांवर कारवाई करा, असा दम पोलिसांना देणार का? टोल न भरताच ही सारी वाहने वेगाने पुण्याकडे गेली, हे टोलनाक्यावरचे सीसीटीव्ही बघूनही लक्षात येईल. ते तपासले जाणार का आणि एरवी सर्वसामान्य शेतकऱ्यांना वीज बिल भरा, असं सांगणारे राज्याचे वित्तमंत्री अजित पवार टोलनाक्यावरून टोल न भरता जाणाऱ्या गजा मारणे समर्थकांच्या गाड्यांचे टोल राज्याच्या तिजोरीत जमा होतील, हे बघणार का?
पुण्यात कोरोना पसरू नये, यासाठी डोळ्यात तेल घालून दक्ष राहणारे आणि १३ ते २३ जुलै २०२० मध्ये पुन्हा एकदा पुण्यावर लॉकडाऊन लादणारे पालकमंत्री पुण्यात गुन्हेगारी वाढणार नाही, यासाठीही डोळ्यात तेल घालून घेतील का? वर्षभराने पुण्यासह दहा महापालिकांच्या निवडणुका आहेत. तुरुंगाबाहेर आलेली ही सारी फौज हृदयपरिवर्तन करून घेऊन शांतपणे हात जोडून निवडणुकीच्या प्रचारात भाग घेऊन राजकीय मास्टर्सना उपकृत तर करणार नाही ना?
या साऱ्या प्रश्नांची उत्तरे काळ तर देईलच; पण पालकमंत्र्यांनी याही प्रश्नांकडे थोडेसे का होईना, लक्ष दिले तर कोरोनाही पसरणार नाही आणि गुन्हेगारीही आटोक्यात राहील.
शैलेंद्र परांजपे
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला