कोरोनामुळे दिवाळीत फटाक्यांवर देशभर बंदी येणार !

हरित न्यायाधिकरणाचा सोमवारी निकाल

National Green Tribunal-NGT

नवी दिल्ली :- थंडीच्या दिवसांत हवेच्या वाढत्या प्रदूषणाने जेथील परिस्थिती एरवीही वाईट असते अशा शहरांमध्ये दिवाळीत फटाक्यांमुळे आणखी प्रदूषण होऊन कोरोना महामारीचा जोर वाढू नये यासाठी यंदाच्या दिवाळीत फटाक्यांवर बंदी घालण्याचे स्पष्ट संकेत राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (National Green Tribunal-NGT) दिले असून यासंबंधीचा औपचारिक आदेश येत्या सोमवारी ९ नोव्हेंबर रोजी दिला जाणार आहे.

न्यायाधिकरणाचे अध्यक्ष न्या. ए. के, गोयल, न्यायिक सदस्य न्या. एस. के. सिंग व डॉ. एस. एस. गरब्याल आणि डॉ. नगिन नंदा यांच्या न्यायपीठाने गुरुवारी सायंकाळी यासंबंधीची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर सोमवारी निकाल दिला जाईल, असे जाहीर केले. सुरुवातीस न्यायाधिकरणापुढे फक्त दिली राजधानी परिक्षेत्रातील प्रदूषण व फटाकेबंदीचा विषय होता. दरम्यान, कोरोनाचे कारण देत राजस्थान व ओडिशा या राज्यांनी फटाकेबंदीचे आदेश काढले. त्यामुळे न्यायाधिकरणाने सुनावणीची व्याप्ती देशव्यापी केली व सर्व  राज्यांना नोटीस काढली. त्यानुसार गुरुवारी झालेल्या  सुनावणीच्या वेळी दिल्ली व प. बंगाल सरकारनेही फटाकेबंदीचे निर्णय  घेतले असल्याचे कळविले. महाराष्ट्र सरकारही असाच निर्णय घेण्याच्या विचारात असल्याच्या बातम्या आहेत; पण गुरुवारच्या सुनावणीत तरी मुख्य सचिवांना नोटीस काढूनही महाराष्ट्र सरकारतर्फे कोणीही हजर नव्हते.

१८ शहरांमध्ये कायमची बंदी?

दिवाळी व कोरोनाशी संबंधित या फटाकेबंदीखेरीज देशभरातील ज्या १२२ शहरांमध्ये हवेचे प्रदूषण कायद्याने ठरवून दिलेल्या कमाल मर्यादेहून (Statutory Limits) नेहमीच जास्त असते तेथे प्रदूषणाची पातळी आटोक्यात येईपर्यंत फटाक्यांवर कायमस्वरूपी सरसकट बंदी घालण्याचे संकेतही न्यायाधिकरणाने दिले आहेत. त्या शहरांमध्ये महाराष्ट्रातील अकोला, अमरावती, औरंगाबाद, बदलापूर, चंद्रपूर, जळगाव, जालना,  कोल्हापूर, लातूर, बृहन्मुबई, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, पुणे, सांगली, सोलापूर, ठाणे व उल्हासनगर या १८ शहरांचा समावेश आहे. तो आदेशही सोमवारीच होणे अपेक्षित आहे.

ही बातमी पण वाचा : दिवाळीत फटाक्यांवर बंदी ; युवक काँग्रेसची आदित्य ठाकरेंकडे मोठी मागणी

अजित गोगटे 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER