“कोरोनावर नियंत्रण मिळवले होते, मात्र भाजपामुळे संसर्ग पुन्हा वाढला”; ममता बॅनर्जींचा आरोप

mamta Banarjee - PM Modi - Maharastra Today
mamta Banarjee - PM Modi - Maharastra Today

नवी दिल्ली :- देशात कोरोनाने (Corona) थैमान घातले आहे. रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. याच दरम्यान पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. एकीकडे तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये आपला गड राखण्याचे प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे भाजपा आपली ताकद वाढवत आहे. सध्या दोन्ही बाजूने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी बुधवारी भाजपावर (BJP) आरोपही केला आहे.

“आम्ही कोरोनावर नियंत्रण मिळवले होते, मात्र भाजपामुळे संसर्ग पुन्हा वाढला” असे म्हणत ममतादीदींनी पुन्हा एकदा भाजपावर हल्लाबोल केला. भाजपाने प्रचारासाठी बाहेरून माणसे आणल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला, असा आरोप बॅनर्जी यांनी केला आहे. एका प्रचारसभेत बॅनर्जी यांनी भाजपा सरकारवर निशाणा साधला.”लसीकरणासंदर्भातील अनेक राज्यांच्या विनंतीला केंद्र सरकार प्रतिसाद देत नाही. नागरिकांचे लसीकरण केल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल. काही दिवसांपूर्वी आम्ही कोरोना परिस्थितीवर नियंत्रण मिळवले होते. मात्र, भाजपाने प्रचारासाठी बाहेरून माणसे बोलावली होती आणि त्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ झाली.” असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.

गेल्या काही दिवसांत पश्चिम बंगालमध्ये कोरोना रुग्ण वाढत आहे. काही दिवसांपूर्वी मतदानादरम्यान करण्यात आलेल्या गोळीबारात चौघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. कूचबिहारच्या सितालकुचीमध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेसचे काही कार्यकर्ते हे आपापसात भिडले. या हाणामारीत अनेक लोक जखमी झाले होते. गोळीबारामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे तर ४ जण जखमी झाले होते.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी “कूचबिहारचा गोळीबार पूर्वनियोजित होता. गृहमंत्री अमित शहांच्या (Amit Shah) निर्देशावर कट रचण्यात येतो” असा गंभीर आरोप त्यांनी केला. अमित शहांच्या राजीनाम्याचीदेखील त्यांनी मागणी केली. सीआयएसएफवर मतदानासाठी रांगेत उभ्या असणाऱ्या मतदारांवर गोळीबार करण्याचा आरोप केला. “अमित शहांनी या घटनेचे उत्तर द्यावे.” असे ममता बॅनर्जींनी म्हणाल्या होत्या.

ही बातमी पण वाचा : ममता दीदी, राग काढायचा तर माझ्यावर काढा : पंतप्रधान मोदी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button