अनलॉक की लॉकडाऊन…सरकारी परस्पर विसंगती

Shailendra Paranjapeलॉकडाऊन ३१ जुलैपर्यंत चालू ठेवणार असल्याचं सरकारनं जाहीर केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या फेसबुक लाइव्ह संवादातून गरज भासली तर लॉकडाऊन पुन्हा लागू करू, असा इशारा दिला होता. गमतीची गोष्ट म्हणजे त्यांच्या फेसबुक लाइव्हच्या तीन-चार दिवस आधी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पुन्हा लॉकडाऊन केलं जाणार नाही, असं जाहीर केलं होतं.

माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी सरकारवर वारंवार टीका केली आहे. ती करताना या सरकारमधले तीन पक्ष तीन परस्परविसंगत विधानं करतात, मंत्र्यांमधे संवाद नाही, मंत्रिमंडळात विसंवाद, तीनही पक्षांमधे विसंवाद आणि सरकारमधलया मंत्र्यांची नोकरशाहीवर पकड नसल्याने सर्व घटक आपापल्या मनाप्रमाणे निर्णय घेताहेत, अशी टीका फडणवीस यांनी केली होती. त्याचं प्रत्यंतर मुख्यमंत्री ठाकरे आणि आरोग्यमंत्री टोपे यांच्या परस्परविरोधी विधानांमुळं आलंय.

करोनासंदर्भात मुंबई आणि पुणे या दोन शहरांमधली परिस्थिती चिंता करावी अशी आहे. त्यातही मुंबई, पुण्यात विशेषतः शहरी भागात करोना सर्व भागांमधे पसरल्याचं लक्षात आलंय. त्यामुळं पुण्यामधे ग्रामीण भागात करोना अटोक्यात आणण्यासाठी टाकलेली पावलं इतरांनी अमलात आणण्याची गरज आहे. ग्रामीण भागात बाहेरच्या मंडळींना किंवा मूळच्या गावातल्या लोकांना बाहेरून येण्यास मनाई करण्यात आली होती. घरच्यांच्या काळजीनं अगदी बंगलोरहून नोकरीत रजा घेऊन भोरला आलेल्या व्यक्तीला घराबाहेर ठेवण्यात आलं होतं आणि कुठून आलो बंगलोरहून पुण्याला, असं त्या व्यक्तीला झालं होतं. पुण्याच्या ग्रामीण भागात नेक कडक उपाय केल्यानं करोना खूपच नियंत्रणात आलाय पण पुणे शहरामधे मात्र तुलनेनं जास्ती संशयित, रुग्ण आणि करोनामृत्यूही दिसून आलेत.

शहरांमधे विशेषतः पुणे आणि मुंबई या शहरांचं कॉस्मोपॉलिटन असणं, झोपडपट्ट्या, दारिद्र्य या बाबी महतत्वाच्या आहेत. त्याबरोबरच तथाकथित सुशिक्षितांचं कुतूहल आणि त्यामुळं विनाकारण घराबाहेर पडून गरज नसलेल्या भागांमधे जाऊन वाहतूक कोंड्या, गर्दी वाढवणं, हेही करोना संसर्गाला कारण ठरत आहे. त्यामुळंच मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा सावधगिरीचा इशारा द्यावा लागलाय आणि अनलॉकपर्व सुरू होऊन महिना होतानाच पुन्हा लॉकडाऊनची भाषा बोलावी लागलीय.

सरकारमधे विसंवाद असला तर आणि जनतेला राज्यकर्ते आत्मविश्वास देऊ शकत नसले तर जनतेचं मनोबलही टिकून राहू शकत नाही. पण आता करोनाच्या बाबतीत अति झालं आणि हसू आलं, अशी सरकारी निर्णयांची स्थिती आहे. पुण्याला लागूनच असलेल्या पिंपरी-चिंचवडमधे करोनाचा मुकाबला करू शकणाऱ्या आणि करोना पॉझिटिव्ह असले तरी कोणतीही लक्षणं नसलेल्यांना घरी पाठवण्याचा निर्णय घेतलाय. घरी राहून जे सोशल डिस्टन्सिंग पाळू शकतात, स्वच्छतागृहाची स्वतंत्र सोय आहे, अशांना घरी पाठवल्यानं जुलैमधे रुग्णसंख्या वाढल्यास रुग्णालयांमधे खाटा उपलब्ध व्हाव्यात, हा या निर्णयामागचा हेतू आहे. पण असा निर्णय पुण्यात घेतलेला नाही. विकेंद्रित पद्धतीनं त्या त्या स्थानिक स्वराज्य संश्तांना अधिकार असले तरी पुणे आणि मुंबईत रुग्णसंख्या वाढत असताना स्थानिक पातळीवर आणि पुणे महानगर क्षेत्रात परस्परसंवाद दानप्रदान होताना दिसत नाही, हेही दिसून येतंय. म्हणूनच पुण्यात चाचण्या वाढवल्या असताना मुंबईत मात्र त्या तितक्या वाढवल्या गेल्या नाहीत.

त्यामुळं आरोग्यमंत्री पुन्हा लॉकडाऊन करणार नाही, असं म्हणून त्याची बातमी येते न येते, तोच गरज भासल्यास पुन्हा लॉकडाऊन करावं लागेल, ती वेळ आणू नका, असं मुख्यमंत्रीच जनतेला सांगतात. तेव्हा परिस्थिती राज्यकर्त्यांच्या  हाताबाहेर जाऊ लागलीय का, अशी शंका येते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER