पुढच्या दोन आठवड्यात दिवसाला हजार बळी जातील, आरोग्य विभागाचा इशारा

corona virus

मुंबई : महाराष्ट्रामधील करोनाबाधितांची (Corona virus) संख्या पुढील दोन आठवड्यांमध्ये झपाट्याने वाढणार असल्याची भीती आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे. ही रुग्णवाढ पाहता देशात कोरोनाची दुसरी लाट आल्याचं स्पष्ट होत आहे. चार एप्रिलपर्यंत राज्यातील अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या तीन लाखांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. कोरोनाची दुसरी लाट जवळपास १०० दिवस भारतात राहील. त्यामुळे १५ फेब्रुवारी ही तारीख गृहित धरली तर मे पर्यंत या लाटेचा परिणाम पाहायला मिळू शकते. या अहवालानुसार एप्रिल- मे मध्ये कोरोनाची दुसरी लाट जोरदार असणार आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्णवाढ ही पुणे, नागपूर आणि मुंबईमध्ये असेल असं सांगण्यात येत आहे.

करोनाबाधित रुग्णांचे प्रमाण आठवड्याला एका टक्क्याने वाढत असल्याचं सर्व जिल्ह्यांमधून गोळा करण्यात आलेल्या आकडेवारीवरुन स्पष्ट होतं आहे. याच आकडेवारीच्या आधारे राज्याच्या आरोग्य विभागाने हा अंदाज व्यक्त केला आहे. संकलित करण्यात आलेल्या माहितीच्या आधारे मृत्यू दर हा २.२७ टक्के असल्याचं सांगण्यात आलं आहे. याच दराच्या आधारे पुढील दोन आठवड्यांमध्ये राज्यामधील एकूण करोना रुग्णांची संख्या २८ लाख २४ हजार ३८२ इतकी होईल आणि मृतांचा आकडा हा ६४ हजार ६१३ पर्यंत जाईल असा अंदाज व्यक्त करण्यात आल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे. म्हणजेच महाराष्ट्रात पुढील दोन आठवड्यांमध्ये करोनामुळे दिवसाला एक हजार जणांचा मृत्यू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. काही राज्यात कडक लॉकडाऊनच्या निर्णयाचे परिणाम पुढील महिन्यात दिसून येतील, असं अहवालात नमूद करण्यात आलंय. तसंच अहवालात राज्यांनी लसीकरणावर भर देण्याबाबत सूचना करण्यात आली आहे.

तसेच राज्यामध्ये बेड्सची संख्या, आयसीयू बेड्स आणि व्हेटिंलेटर्सची संख्या पुरेशी असली तरी ऑक्सिजन सेवा असणाऱ्या बेड्सची संख्या चार हजारांनी वाढवण्याची आवश्यकता असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे. पुढील काही दिवसांमध्ये ठाणे आणि नागपूर या दोन जिल्ह्यांमधील बेडची संख्या वाढवली नाही तर परिस्थिती गंभीर होईल अशी भीती राज्यातील आरोग्य विभागाचे सचिव डॉक्टर प्रदीप व्यास यांनी व्यक्त केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER