कोरोना; आरोग्यमंत्री राजेश टोपे ग्राउंड झिरोवर, सर्वात संवेदनशील धारावीला भेट

Rajesh Tope-dharavi-varsha gaikwad

मुंबई : जगातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी भागात कोरोनाचे सात पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. सध्या या भागात कोरोनाच्या संशयितरुग्णांचे शोधकार्य सुरु आहे. आणि याच पार्श्वभूमीवर या भागात सुरू असलेले सर्वेक्षणाचे काम तसेच क्वारंटाईन सुविधा याचा आढावा घेण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज धारावी परिसराला भेट दिली. एकीकडे कोरोनाच्या दहशतीमुळे सर्वच पक्षातील मंत्र्यानी आणि नेत्यांनी होम कोरंटाईन केले असताना टोपे यांनी थेट संवेदनशील भागालाच भेट दिल्याने परिसरात त्यांच्या हिमतीची जोरदार चर्चा सुरु आहे.

यावेळी टोपे यांनी धारावी पोलीस ठाण्याला भेट दिली. आणि पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करत परिसरात संचारबंदीचे उल्लंघन होऊ नये याबाबत सूचना केली. तसेच या भागात फक्त कोरोना उपचारासाठी उपलब्ध केलेल्या साई हॉस्पीटलला भेट देऊन तेथील व्हेंटीलेटर्सची संख्या वाढविण्याच्या सूचना आरोग्यमंत्र्यांनी यावेळी महापालिका प्रशासनाला दिल्या.

त्याचप्रमाणे या परिसरात क्वारंटाईन सुविधा असलेल्या राजीव गांधी स्पोर्टस् कॉम्प्लेक्सलाही भेट दिली. संसर्ग रोखण्यासाठी गर्दीवर नियंत्रण आणण्याकरता अधिक कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देशही त्यांनी या विभागाच्या पोलिस उप अधीक्षकांना दिले. यावेळी त्यांच्यासोबत धारावी मतदार संघाच्या आमदार आणि शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड उपस्थित होत्या.

कोरोना व्हायरस : महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच मंत्रिमंडळाची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक