भारतात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण सापडला

corona virus india kerala

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने चीनमध्ये हाहाकार पसरवला आहे. चीनमध्ये कोरोनाच्या लागणमुळे १७० लोकांनी जीव गमावला आहे. कोरोनाचा फटका भारतालाही बसण्याची दाट शक्यता आहे; कारण कोरोना विषाणूचा  पहिला रुग्ण भारतात दाखल झाला असून तो केरळमध्ये आढळून आला आहे. डॉक्टर आणि सरकारी अधिकाऱ्यांनी याबाबत पुष्टी  दिली आहे. हा रुग्ण केरळमधील कोणत्या भागात राहतो याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा रुग्ण चीनमधील वुहान विद्यापीठात शिकत होता. वुहान या शहरात कोरोना विषाणूचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. हा रुग्ण कोरोना विषाणूच्या तपासणीत पॉझिटिव्ह आला आहे. सध्या या रुग्णाची तब्येत स्थिर असून तो डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहे.

या दरम्यान कोरोना विषाणूमुळे एका भारतीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्रिपुरा येथे राहणाऱ्या या रुग्णाचा मलेशिया येथे मृत्यू झाला आहे. त्याच्या कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार मलेशियातील एका रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. मानिर हुसेन नावाचा हा इसम २०१८ मध्ये मलेशियात गेला होता. तो तेथील एका रेस्टॉरंटमध्ये काम करीत होता.