दिल्लीतून परतलेल्या ४७ जणांची तपासणी

मंगळवारी सात जणांना तपासले

corona virus-examined 47 persons returning from Delhi

औरंगाबाद : मार्च महिन्यात स्वगृही परतलेल्या ४७ जणांची मिनी घाटीत आतापर्यंत तपासणी करण्यात आली आहे. तर मंगळवारी गांधीनगर भागातील सात जणांची तपासणी करण्यात आल्याची माहिती क्रांतीचौक पोलिस ठाण्याच्या निरीक्षक निर्मला परदेशी यांनी दिली. नागरिकांनी एकसारखी मागणी केल्यानंतर आज दिल्लीहून आणि जमातमधून आलेल्या सात जणांना तपासणीसाठी पाठविल्याचेही निरीक्षक परदेशी यांनी सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परदेशातून व इतर गावांमधून शहरात परतलेल्या सर्व नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. दिल्लीहून मार्च महिन्यात परतलेल्या ४० जणांची यापूर्वी तपासणी करण्यात आल्याचे आज सहायक पोलिस आयुक्त डॉ. नागनाथ कोडे यांनी सांगितले.

तर गांधीनगरात २१ आणि २७ मार्च रोजी सात जण जमात तसेच दिल्लीहून परतले होते. त्यांच्याबाबत स्थानिक नागरिकांनी क्रांतीचौक पोलिसांना माहिती दिली होती. त्या अनुषंगाने आज पोलिस निरीक्षक परदेशी व कर्मचा-यांनी माहिती घेऊन सात जणांना ताब्यात घेतले. या सातही जणांना तपासणीसाठी मिनी घाटीत पाठविण्यात आले. त्यांची डॉक्टरांकडून तपासणी सुरू असून, आतापर्यंत त्यांचा अहवाल प्राप्त झाला नसल्याचे निरीक्षक परदेशी यांनी सांगितले.