कोरोना काळातले बालपण आणि भावविश्व !

change in education Corona virus

Pandemic काळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या अनेक परिणामांपैकी एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे त्याचा मुलांवर आणि विशेषतः त्यांच्या बालपणावर झालेला परिणाम होय. कारण हा परिणाम आता केवळ शिक्षणात झालेल्या बदलाबद्दल किंवा शिक्षणाच्या नव्या पद्धतीशी (change in education) निगडित नाही. याचा परिणाम झालाय तो सरळ सरळ मुलांचे जे काही भावनिक जग असते त्यावरच! नुकत्याच केल्या गेलेल्या एका सर्वेक्षणानुसार, केजी ते बारावीपर्यंतच्या वयोगटातील मुलांच्या बालपणावर कोरोना संसर्गाचा काय परिणाम झाला यावर सर्वेक्षण केले. त्यासाठी देशभरातील पालकांनी १२ प्रश्नांवर निरीक्षणात्मक व अनुभवाधारित मते दिली.

वयोगटांप्रमाणे यात मतमतांतरेही दिसतात आणि ते साहजिक आहे. केजी ते दुसरी, तिसरी ते पाचवी , सहावी ते नववी आणि नववी ते बारावी अशा वेगवेगळ्या गटांतील भावविश्व जाणून घेण्याचा प्रयत्नही या सर्वेक्षणात झाला. त्यातील निष्कर्षानुसार, सर्वच वयोगटांतील जास्तीत जास्त मुलांचे वर्तन बिघडल्याचे लक्षात आले. तसेच ऑनलाईन शिक्षणातील निरुत्साह व कंटाळा जाणवू लागल्याची बाब समोर आली. त्याचप्रमाणे मुलांचा चिडखोरपणा वाढला असून, ते क्लास चालू असताना शिस्त पाळत नाहीत व त्यांचा स्क्रीन टाईम वाढला आहे .तसेच खेळकर वयातील मुले बंदिस्त झाल्याने त्यांच्या एकूणच व्यक्तिमत्त्वावर व मानसिक स्थितीवर परिणाम होतो आहे.

माध्यमिक शाळेतील मुलांचे भवितव्य व त्यांचे वर्तनदेखील पालकांसाठी चिंतेचा विषय बनत आहे. एकूणच बंदिस्तपणामुळे ५५ टक्के मुलांचे वर्तन बिघडले . मुळात ऑनलाईन शिक्षण हेच आवडत नसून तसे शिकण्याची इच्छा त्यांच्यात राहिलेली नाही. मोबाईल, कॉम्प्युटर आकर्षण यापलीकडेही शिक्षणातील मुक्त आनंदाला ही मुले पारखी झाली . त्यामुळे ती ऑनलाईन शिक्षणात रमत नाहीत. एकूणच या सर्वेक्षणातून हाती आलेली माहिती केवळ शिक्षक, पालकांनाच नाही, तर शिक्षणव्यवस्थेला आणि संपूर्ण समाजाला जागं करणारी आहे .आणि अतिशय संवेदनशीलतेने त्यांनी हा विषय हाताळायला हवा; कारण हा आपल्या उद्याच्या भविष्याविषयीचा प्रश्न आहे.

भावी पिढीचा प्रश्न आहे. खरं तर आज-काल बुद्धिमत्तेपेक्षा, IQ पेक्षा भावनिक बुद्धिमत्तेला EQ ला महत्त्व जास्त आहे, हे सगळ्यांना पटतंय; पण त्या दृष्टीने जी अंमलबजावणी व्हायला पाहिजे, ती होतच नाही किंवा जेमतेम होते. खरं तर सध्याच्या शिक्षणात किंवा शिक्षण पद्धतीत याकडे दुर्लक्षच होते आहे. त्यातून आता अशी परिस्थिती. म्हणजे तर विचारायलाच नको! यातून अनुभवलेला आणखीन एक गंभीर मुद्दा म्हणजे खेळायला, बागडायला मिळत नाही. त्यामुळे चिडचिड होते ही एक गोष्ट आणि करमत नाही त्यामुळे सतत काहीतरी खायला मागण्याची प्रवृत्ती नैसर्गिकरीत्या वाढते. त्यामुळे मुलांमध्ये स्थूलतेचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते आहे. सतत उठून खायला काय देणार?

त्यामुळे पॅक फूडचा वापर (नको असलेला ) उलट जास्त केला जातो. जास्तीत जास्त ऑनलाईन शिक्षणासाठी मुलांकडे मोबाईलच आहेत. लॅपटॉप, कॉम्प्युटर असलेल्यांचे प्रमाण अत्यल्प आहे . त्यामुळे मुले मोबाईल कुठेही घेऊन फिरतात, केवळ नाममात्र मोबाईलवर असतात. मोठी मुले कॅमेरा व आवाज म्युट करून इकडे तिकडे फिरतात, कमेंटस करतात. शिक्षक बोलत राहतात. समोरासमोर नसल्याने मुलांना फार आकलन होत नाही. तसेही वर्गातच असताना मुलांच एकाग्रता अत्यल्प असते. मोबाईल शिक्षणात तर उजेडच ! स्वयं अध्ययन पद्धतीने अभ्यास करण्याची मुळातच सवय असावी लागते. पण बहुतेक मुलांना आपल्याकडे ती रुजवली जात नाही .

स्पून फिडिंगची सवयच लावली जाते .खरं तर हा स्वतंत्र लेखाचा विषय व्हावा. अतिशय कमी प्रमाणात स्वयं अध्ययन छान होते आहे. यात मुळात अभ्यासविषयक गंभीरता न जाणवणे, मुळात विषयाची आवड निर्माण न होणे, पहिल्यापासूनच अभ्यासाच्या सवयी आणि पद्धतींचा विकासही झालेला नसणे या गोष्टी कारण ठरतात. त्यावर आता हे मोबाईलवरील शिक्षण! म्हणजे ‘आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास’ अशी परिस्थिती आहे. शाळा ऑनलाईन, क्लासेस ऑनलाईन, मनोरंजन, मित्रमैत्रिणींशी गप्पा ! एकूणच काय सगळं मुलाचं जीवनच ऑनलाईनमय झालेलं आहे .

त्यामुळे वाढलेला हा ‘स्क्रीन टाईम’ मोबाईल डीपेंडन्सीकडे नेणारा आहे आणि ही सगळ्यात मोठी समस्या आहे. कारण तसेही मोबाईल किंवा सोशल मीडियाचा जास्त वापर हा प्रश्न मुळात आहेच. वाढत्या स्क्रीन टाईममुळे झोप कमी येणे, डोळ्यांचा त्रास वाढणे, एकाग्रता न होणे, लक्षात न राहणे हे प्रश्न समोर येतात आहेत. तसेच विद्यार्थ्यांची बौद्धिक व भावनिक पातळी परिपक्व नसल्याने ते जे पाहतात, ऐकतात, त्यांना ते खरे वाटते. याकडे लक्ष देणे गरजेचे होऊन बसलेले आहे. यापलीकडे सद्य:स्थितीत तसं बघितलं तर घराघरांमधून वेगवेगळ्या प्रकारचा ताण वाढला आहे. त्याचा परिणाम घरातील वातावरणावर व घरातील व्यक्तींच्या परस्परातील संबंधांवर आणि संवादावर होऊन घरात संघर्षाचे प्रसंग घडू शकतात. हे सगळं मुलं बघत असतात, की जे त्यांच्या या वयामध्ये अयोग्य आहे . त्यामुळे स्वतःच्या ताणाचे योग्यरीतीने नियोजन करता येणे, ही पण आज पालकांसाठी मोठी गरज होऊन बसली आहे. खरं तर आतापर्यंत अशी वेळ होती की शाळांच्या वेळा ,क्लासच्या वेळा ,आपली कामे यामुळे पालकांना मुले हाती लागायची नाहीत.

त्यांच्याशी संवाद साधायला वेळ मिळायचा नाही. पण दुर्दैव असं की पालकांना ,मुलांचा पुस्तकी अभ्यासच अजूनही सगळ्यात महत्त्वाचा वाटतो. खरं बघितलं तर एखाद्या वर्षातील त्या विद्यार्थ्यांच्या या ॲकॅडमिक वर्षापेक्षा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची घडण होण्याची आवश्यकता , गरज आज कित्येक पटीने जास्त आहे. तिला अडचण समजायचं की संधी? संधीचं सोनं करायचं की अडचणींवर रडत बसायचं ? हे पालकांनी, शिक्षकांनी आणि सगळ्या समाजानं ठरवायचं आहे . मार्ग आपोआप समोर येतील. ते कुठले असू शकतील यावर विचार करूया पुढील काही लेखांमधून ! या स्क्रीन टाईमला पर्याय काय असू शकतात? तो कसा मॅनेज करावा ? भावनिक बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी काय काय करता येईल ? किंवा प्रत्येकाने आपल्या ताणाचे नियोजन कसे करावे ? अशा अनेक विषयांवर आपल्याला बोलता येईल आणि त्याचा उपयोग होईल. तोपर्यंत तुम्हीही विचार करा की यावर काय काय पर्याय तुम्हाला सुचतात आहे ते !

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER