कोरोना : केंद्राकडून महाराष्ट्र सरकारला इशारा

Corona virus-Center govt warns Maharashtra government

नवी दिल्ली : दीड महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात प्रथमच देशातील सर्वाधिक कोरोना (Corona Virus) रुग्ण नोंदवले गेले. ही परिस्थिती चिंताजनक असून, महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते, असा इशारा विज्ञान आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे (सीएसआयआर) (CSIR) प्रमुख डॉ. शेखर मांडे (Shekhar Mande) यांनी दिला.

देशात आजघडीला महाराष्ट्र (Maharashtra) आणि केरळ (Kerala) या दोनच राज्यांत कोरोनाची स्थिती तुलनेने अधिक गंभीर आहे. मंगळवारी महाराष्ट्रात 3,663 नवे रुग्ण नोंदवले गेले होते. काल बुधवारीही 4,787 रुग्ण नोंदवले गेले. केरळमध्येही 3 हजारांपर्यंत कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत ही नवी रुग्णसंख्या अधिक असून, कोरोनाची दुसरी लाट येण्याचीच ही चिन्हे आहेत, असे डॉ. मांडे यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना स्पष्ट केले.

देशभरात लसीकरण मोठ्या प्रमाणात सुरू असले, तरी लोक विनाकारण रस्त्यांवर उतरून गर्दी करत आहेत. त्यातूनच कोरोना संक्रमणाचा धोका वाढला. घराबाहेर पडताना मास्क लावावा, विनाकारण गर्दी करू नये, असे आवाहन करतानाच डॉ. मांडे म्हणाले, कोरोनाला रोखण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन केलाच पाहिजे, असा नाही. मात्र, लोकांनीच आता नियम पाळून कोरोना रोखला पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट ही अधिक वेगाने पसरते आणि दुसऱ्या लाटेत मृत्यूचे प्रमाणही अधिक असते. त्यामुळे महाराष्ट्राने आताच सतर्क व्हावे आणि प्रत्येकाने कोरोनाचे नियम पाळावेत, अशी प्रतिक्रिया ‘आयसीएमआर’चे निवृत्त संचालक डॉ. रमण गंगाखेडकर यांनीदेखील व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER