कोरोना संसर्ग : अशोक चव्हाणांनी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे आरोप फेटाळले

Amarinder Singh-Ashok Chavan

नांदेड : कोरोना व्हायरसवरून काँग्रेसच्याच दोन दिग्गज नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. नांदेडमधून पंजाबमध्ये गेलेल्यांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केलेले आरोप अशोक चव्हाणांनी फेटाळून लावले आहेत. नांदेडहून पंजाबला जातेवेळी प्रवासादरम्यान कोरोनाचा संसर्ग झाला असावा, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली आहे. गुरुद्वारामधल्या २० सेवादरांचा संसर्गही जुना नसून मागच्या काही दिवसातलाच आहे, असंही चव्हाण म्हणाले.

नांदेडवरून पंजाबलागेलेल्या भाविकांची चाचणी करण्यात आली होती. तसंच या भाविकांमध्ये कोरोनाची कुठलीही लक्षणं आढळून आलेली नव्हती. लक्षणं दिसून आली असती, तर गुरुद्वारा प्रशासनाने त्यांची चाचणी केली असती आणि त्यांच्यावर उपचार केले असते, असं अशोक चव्हाण यांनी सांगितलं.

काय म्हणाले अमरिंदर सिंग?

पंजाबमध्ये कोरोनाची संख्या वाढल्यानंतर मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी महाराष्ट्र सरकारवर आरोप केले. महाराष्ट्र सरकार नांदेडमध्ये अडकलेल्या भक्तांच्या कोरोना चाचणीवरून आमच्याशी खोटं बोललं. आम्ही भाविकांच्या कोरोना टेस्ट केल्या असल्याचं त्यांनी आम्हाला सांगितलं. आम्हाला माहिती असतं, तर आम्ही नक्कीच टेस्ट केल्या असत्या, असं अमरिंदर सिंग म्हणाले.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी माझी चर्चा झाली. यानंतर ८० बस आम्ही नांदेडच्या हुजुर साहिबला रवाना केल्या. आम्हाला वाटलं तिकडे १५०० भक्त असतील, पण बस तिकडे पोहोचल्या तेव्हा ३ हजारांपेक्षा जास्त जण असल्याचं समजलं. आतापर्यंत ७ हजारांपेक्षा जास्त जण नांदेडहून पंजाबला परतल्याची माहिती अमरिंदर सिंग यांनी दिली आहे.

नांदेडमधून पंजाबला गेलेले भाविक कोरोना पॉझिटिव्ह; पंजाबच्या आरोग्य मंत्रालयाचा महाराष्ट्र सरकारवर आरोप