
दिल्ली :- देशात आजपासून कोरोना (Corona) प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले. ३,३५१ सत्रांमध्ये १ लाख ९१ हजार १८१ जणांना लसीचे डोस देण्यात आले. देशातील ११ राज्यांमध्ये सीरमच्या ‘कोव्हिशिल्ड’ (Covishield) आणि भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ (Covaxin) लसीचे डोस देण्यात आले.
आसाम, बिहार, हरयाणा, कर्नाटक, ओदिशा, राजस्थान, महाराष्ट्र, तामिळनाडू, तेलंगण, उत्तर प्रदेश आणि दिल्ली या राज्यांमध्ये लसीचे डोस देण्यात आले. लसीकरणानंतर कुणालाही अद्यापपर्यंत रुग्णालयात दाखल करावे लागल्याची माहिती नाही, असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले.
मुंबईत (Mumbai) कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी मुंबईत आरोग्य क्षेत्रातील ५० ते ७० टक्के कर्मचारी पात्र ठरले. त्यांना लसीचे डोस देण्यात आले. शनिवारी मुंबईत एकूण चार हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा डोस दिला गेला. मुंबईत कुठल्याही लसीकरण केंद्रावरुन लस टोचल्यानंतर साईड इफेक्ट झाल्याचे वृत्त नाही.
केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरुन सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांचे यशस्वी लसीकरणाबद्दल कौतुक केले.
लस कमी मिळाली – राजेश टोपे (Rajesh Tope) यांची तक्रार
राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी आज पुन्हा एकदा मागणीपेक्षा कमी कोरोना प्रतिबंधक लसींचा पुरवठा केल्याचा मुद्दा उपस्थित केला. महाराष्ट्राला लसींचे १७.५० लाख डोस पाहिजे आहेत. आठ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरणासाठी ‘कोविन अॅप’वर रजिस्ट्रेशन केले आहे. आम्हाला लसीचे १० लाख डोस मिळाले. अजून साडेसात लाख डोसची आवश्यकता आहे, असे सांगितले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला