कोरोना उपचारांचे दावे राज्यात ९०० कोटींवर

मुंबई : कोरोना (Corona) रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना त्यांच्या उपचार खर्चापोटी विमा कंपन्यांकडे सादर केल्या जाणाऱ्या दाव्यांच्या संख्येतही वाढ होते आहे. ३१ आॅगस्टपर्यंत राज्यातील ७० हजारांपेक्षा जास्त रुग्णांनी उपचार खर्चाच्या परताव्यासाठी विमा कंपन्यांकडे अर्ज केले होते.

त्याची रक्कम ९०० कोटी रुपये होती. जनरल इन्शुरन्स कौन्सिलकडील (General Insurance) आकडेवारीनुसार देशभरातून ३१ आॅगस्टपर्यंत १ लाख ७९ हजार कोरोना रुग्णांचे २ हजार ७०० कोटी रुपयांचे दावे विमा कंपन्यांकडे (Insurance Company) दाखल झाले आहेत. त्यापैकी १ लाख १० हजार रुग्णांची जवळपास एक हजार कोटी रुपयांची प्रतिपूर्ती कंपन्यांनी केली आहे. उर्वरित दाव्यांच्या मंजुरीची प्रक्रिया सुरू आहे.

महाराष्ट्रातूनच जास्त दावे करण्यात आले आहेत. यातील ७५ टक्के दावे मुंबई (२१,५००), पुणे (१५,८००) व ठाणे (८,५००) या शहरांतील आहेत. दाव्यांबाबत महाराष्ट्रापाठोपाठ तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांचा क्रमांक लागतो. शहरी भागांतील रुग्णांना सरासरी दीड लाख तर ग्रामीण भागातील रुग्णांना ७५ ते ९० हजार रुपयांपर्यंत दाव्यांचा परतावा मिळत असल्याचे कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सांगितले.

१५ लाख लोकांनी काढली कोरोना पॉलिसी

कोरोना साथ सुरू झाल्यानंतर, रुग्णांवर उपचार खर्चाचा भार पडू नये यासाठी इन्शुरन्स रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या (आयआरडीएआय) सूचनेनुसार विमा कंपन्यांनी ‘कोरोना कवच’ व ‘कोरोना रक्षक’ या दोन विशेष विमा पॉलिसी बाजारात आणल्या. दीड महिन्यात सुमारे १५ लाख लोकांनी या पॉलिसी घेतल्या आहेत. साडेतीन महिने, साडेसहा महिने आणि साडेनऊ महिन्यांच्या कालावधीसाठी असलेल्या या पॉलिसींमध्ये २५० ते ३००० रुपयांपर्यंतचा प्रीमियम भरून ५० हजार ते पाच लाखांपर्यंतचे विमा कव्हर मिळते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER