औरंगाबाद ग्रामीण भागात आता ड्रोनद्वारे गस्त

aurangabad news

औरंगाबाद :- कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळे मार्ग अवलंबिले जात आहेत. त्यात पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने ग्रामीण भागात ड्रोनद्वारे गस्त घालण्यात येत आहे. या माध्यमातून धार्मिकस्थळे, बाजारपेठा, महामार्ग, रस्ते या ठिकाणची गर्दी ड्रोनद्वारे टिपून विनाकारण फिरणा-यांवर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी मंगळवारी दिली.

औरंगाबाद जिल्ह्यात सहा उपविभाग असून, या सहा उपविभागात प्रत्येकी एक ड्रोन याप्रमाणे औरंगाबाद ग्रामीण, सिल्लोड, कन्नड, गंगापूर, पैठण, वैजापूर या उपविभागातील २३ पोलिस ठाण्यांतर्गत येणा-या धार्मिकस्थळे, बाजारपेठा, रस्त्यांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. रस्त्यांवर गर्दी करणारे, विनाकारण फिरणा-या नागरिकांवर व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या सहाय्याने लक्ष ठेवले जात आहे. संचारबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करणा-यांवर आजपर्यंत ४० गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. रस्त्यांवर बंदोबस्त कामासाठी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना कोरोना आजाराची प्रतिबंधात्मक साहित्याची एक किट देण्यात आलेली आहे. त्यामध्ये कॉटन मास्क, सॅनिटायझर्स, बॉटल, मॉस्किटो, डेटॉल हॅन्डवॉश किट, सर्जीकल हॅन्ड ग्लोजसह सी-व्हिटॅमिनच्या गोळ््यांचा समावेश आहे. तसेच नागरिकांना तक्रार करण्यासाठी ९९२३७८७८८७ हा व्हॉटसअ‍ॅप क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यावर नागरिकांना संपर्क साधता येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठीही हाच क्रमांक असून, त्यावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत असल्याचे अधीक्षक पाटील यांनी सांगितले.

अफवांवर विश्वास ठेऊ नका.

समाज माध्यमांवरून पसरविण्यात येणा-या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेऊ नये. समाज माध्यमांवर येणा-या संदेशांची खात्री करूनच ते पुढे पाठवावेत, असे आवाहनही अधीक्षक पाटील यांनी केले आहे.


Web Title : Rural areas of Aurangabad now patrolled by drone

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)