वर्ध्यात 75 विद्यार्थ्यांना कोरोना, तर नागपुरात एकाच दिवशी कोरोनाचे 500 रुग्ण

वर्धा : काही दिवसांपासून नियंत्रणात असलेल्या कोरोना विषाणूने (Coronavirus) पुन्हा एकदा डोकं वर काढण्यास सुरूवात केली आहे. विशेष म्हणजे विदर्भात नागपूरसह आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. काल हिंगणघाट येथील निवासी वसतिगृहात 75 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे येथे खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे नागपुरात (Nagpur) 500 नवे रुग्ण आढळून आल्याने प्रशासनामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

हिंगणघाट येथील सातेफळ मार्गावर असलेल्या एका खासगी संस्थेच्या निवासी वसतिगृहातील एका विद्यार्थ्याला चार दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांनतर येथील विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी केली असता तब्बल 75 विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे उघड झाले. या सर्व विद्यार्थ्यांना वसतीगृहातच विलगिकरणात ठेवतण्यात आले असून त्यांच्यावर आरोग्य विभागाकडून उपचार केले जात आहेत. या प्रकारामुळे शासकीय तसेच खासगी वसतीगृह सुरु करणे योग्य आहे का?, असा प्रश्न विचारला जात आहे.

फक्त दोन दिवसात या निवासी वसतिगृहातील तब्बल 75 विद्यार्थ्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर येथे खळबळ आडाली आहे. विशेष म्हणजे कोरोनाची लागण झालेले सर्व विद्यार्थी हे दहा ते बारा वर्षे या वयोगटातील आहेत. त्यामुळे कोरोनाग्रस्त विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. सोबतच सरकारी आणि खासगी संस्थांची वसतिगृहे सुरु करणे योग्य आहे का?, असा प्रश्न विचारला जात आहे.

दुसरीकडे नागपूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 500 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. तर दिवसभरात पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात शहरातील तीन आणि ग्रामीण भागातील दोघांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, गेल्या आठवडाभरात नागपूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढते आहे. नागपुरातील कोरोनामुळे एकूण मृत्यूसंख्या ही 4 हजार 315 वर पोहोचली आहे. नागपुरात अनेक ठिकाणी मास्कचा वापर नाही, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, अनेक लोक कोव्हिडचे नियम पाळत नसल्याने संसर्ग वाढत असल्याचं दिसून येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER