कोरोना : महाराष्ट्राची स्थिती सावरते आहे; आज विक्रमी २६४०८ रुग्ण झाले बरे

Corona Virus

मुंबई : राज्यात आज दिवसभरात कोरोनाचे सुमारे २६ हजार ४०८ रुग्ण बरे झालेत. एका दिवसात करोनाचे रुग्ण बरे होण्याचा हा नवा उच्चांक आहे. गेले तीन दिवस राज्यात नव्या रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा जास्त आहे, हा खूप मोठा दिलासा आहे.

शनिवारी राज्यात २३ हजार ५०१ रुग्ण बरे झाले होते. त्याआधी शुक्रवारी २२ हजार ७८ रुग्णांनी करोनावर मात केली होती. आज हा आकडा वाढून २६ हजार ४०८ वर पोहचला. नवा उच्चांक नोंदवला आहे. राज्यात आतापर्यंत ८ लाख ८४ हजार ३४१ रुग्ण बरे झाले असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७३.१७ टक्के झाले आहे.

राज्यात गेल्या २४ तासांत २० हजार ५९८ नवीन रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत एकूण ५८ लाख ७२ हजार २४१ संशयित रुग्णांच्या चाचण्या घेण्यात आल्या. १२ लाख ८ हजार ६४२ चाचण्यांचे अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आले. एकूण चाचण्यात २०.५८ टक्के नमुने पॉझिटिव्ह आढळले आहेत. राज्यात सध्या २ लाख ९१ हजार २३८ अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असले तरी रुग्णांच्या मृत्यूचा आकडाही कायम आहे. आज राज्यात ४५५ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी २३८ मृत्यू हे मागील ४८ तासांतील आहेत. १०९ मृत्यू मागील आठवड्यात झालेले आहेत तर उर्वरित १०८ मृत्यू एक आठवड्यापूर्वीचे आहेत व त्यांची आता नोंद करण्यात आली आहे. राज्यातील करोनामृत्यूंचा एकूण आकडा ३२ हजार ६७१ झाला असून मृत्यूदर सध्या २.७ टक्के आहे. राज्यात सध्या १८,४९,२१७ संशयित रुग्ण होम क्वारंटाइन आहेत व ३५ हजार ६४४ संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

पुणे, मुंबई सावरते आहे

पुणे आणि मुंबई मधील अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा वेगाने कमी होतो आहे. पुणे जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा ८० हजारपार गेला होता. गेले काही दिवस त्यात घट होते आहे. आज यात मोठी घट झाली आहे. हा आकडा शनिवारी ७९४८९ होता तर आज ७४७६८ इतका खाली आला आहे. मुंबईतही आज पाच हजारावर रुग्ण बरे झालेत. अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ठाणे जिल्ह्यापेक्षाही कमी झाली आहे. मुंबईत अॅक्टिव्ह रुग्णांचा आजचा आकडा २७ हजार ७८७ आहे तर ठाणे जिल्ह्यात तो २९ हजार ६५४ आहे.

Check PDF :-प्रेस नोट २० सप्टेंबर २०२०

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER