कोरोना : मुख्यमंत्र्यांची भूमिका आणि राजकीय एकमतासाठी धडपड…

Cm Uddhav Thackeray - Maharastra Today
Cm Uddhav Thackeray - Maharastra Today

Shailendra Paranjapeकोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या परिणामस्वरूप महाराष्ट्राची वाटचाल पुन्हा एकदा संपूर्ण लॉकडाऊनच्या दिशेने झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी २०२० च्या मार्चमध्ये देशव्यापी लॉकडाऊन लावला आणि त्यावर हा लॉकडाऊन (Lockdown) अचानकपणे जनतेवर लादला गेला, अशी टीका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी केली होती. ती टीका केलेली असल्याने आता उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रात लॉकडाऊन लावण्याची गरज स्पष्टपणे दिसत असली तरीही त्यांना तो अचानकपणे लावता येत नाहीये. त्यासाठीच तर मग विविध समाजघटकांशी आणि विरोधकांसह सर्वच पक्षांशी चर्चेचा खेळ खेळला गेलाय.

वास्तविक, गेल्या आठवड्यातच मामु म्हणजे माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लॉकडाऊन हा एकच पर्याय स्वच्छपणे दिसत होता. पण त्या वेळी सरकार अडचणीत आल्यानंतर कंठ फुटलेल्या काँग्रेसनं लॉकडाऊनविरोधात आवाज दिला. ज्येष्ठतम मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अचानक लोकभावनेविरुद्ध लॉकडाऊन लावलात तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असं मामु ठाकरे यांना सुनावलं. आता वेगळा विचार म्हणजे काय तर तुमची खुर्ची काढून घेऊ, दुसरं काय…

तीच गोष्ट या तीन पायांच्या सरकारला सत्तेत आणणाऱ्या राष्ट्रवादीची. त्यांनीही मामु ठाकरे यांना अल्टिमेटम देऊन टाकला. त्यामुळे मुख्यमंत्री मनात असूनही लॉकडाऊन लावू शकले नाहीत. आता सारेच राजकीय पक्ष विशेषतः महाराष्ट्रातल्या महाआघाडी सरकारचे महासदस्य पक्ष लॉकडाऊनला पाठिंबा देत आहेत, तर गेल्या आठ-दहा दिवसांत त्यांना हा साक्षात्कार कशामुळे झालाय, हे विचारायला नको का? मागच्या आठवड्यात वेगळा विचार करू, अशी धमकी देणाऱ्या दोन्ही काँग्रेसना आता लॉकडाऊनची उपरती कशी काय झाली, हा प्रश्न म्हणजे वाझे याच्याकडे नेमक्या गाड्या किती आणि कोणत्या, याइतकाच जटिल नाही का?

असो, पण सरकारमधल्या घटकपक्षांचं तरी एकमत झालंय. त्यांचं ठरलंय. विरोधी पक्षांनी सगळंच ऐकून घेतलं तर मग काय उपयोग? प्रमुख विरोधी पक्ष भारतीय जनता पक्षानं मामु उद्धव ठाकरे यांना इशाराच दिलाय. विविध समाजघटकांचा विचार करा, त्यांना काय देणार ते सांगा आणि नेमकं काय करताहात तेही विश्वासात घेऊन सांगा, असं त्यांनी सुनावलंय.

आता आली का पंचाईत. हे सारं करायचं म्हणजे थोडा वेळ जाणार. आता लॉकडाऊन लावायचा. पण पुन्हा तेच. मोदींनी लावला तसा अचानक लावायचा नाही. मग लोकांना पुरेसा वेळ द्यायचा. म्हणजे गुढीपाडवा, आंबेडकर जयंती वगैरे वगैरे हे सारं झालं की मग लॉकडाऊन लावायचा. तो लावला जाणार म्हटल्यावर लोकांना खरेदीसाठी वेळ द्यायचा. म्हणजे आता घरीच राहायचं म्हटल्यावर माणसं जिवंत राहायला तर हवीत आणि त्यासाठी त्यांना खायला किमान अन्नधान्य तर नको का?

पुन्हा पहिले पाढे पंचावन्न. वाण्याच्या दुकानाच्या बाहेर जीवघेण्या रांगा लागतील आणि मुळात आपला कोरोनाचा विषाणू स्मार्ट आहे. त्याला समजेल की हे लोक बिचारे लॉकडाऊनच्या तयारीसाठी खरेदी करायला आलेत. मग कोरोना त्यांना काही करणार नाही. तो थांबेल, वाट पाहील. दुकानांच्या समोरच्या रांगा संपल्या की संध्याकाळी म्हणजे अंधार पडल्यावर बागुलबुवासारखा येईल आणि भिकारी भीक मागतात तसे अन्न वाढा हो माय….अशी हाळी देत कुणाला कोरोनाचा रोग हवाय रे बाबांनो, असं म्हणत ओरडत फिरेल रस्तोरस्ती.

एकूणच काय तर लॉकडाऊनबाबत सरकार पार गोंधळलेल्या अवस्थेत दिसत आहे. राजकीय कारणास्तव सरकारमधील दोन्ही मित्रपक्षांना लॉकडाऊन नको आहे ही अंदर की बात आहे. कारण कडक लॉकडाऊन लावल्यास जनतेचा रोष पत्करावा लागेल अशी त्यांना भीती आहे. शिवसेनेचे नेते हेच मुख्यमंत्री असल्याने शिवसेनेची वेगळी भूमिका नाही. मुख्यमंत्र्यांना लॉकडाऊन हवा आहे आणि आपल्या भूमिकेच्या मागे महाराष्ट्राचे एकमत उभे राहावे यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे प्रमाण वाढत आहे. मृत्यूचा आकडा फुगत चालला आहे हे अपयश झाकण्यासाठी केंद्र सरकारकडे टीकेचा रोख वळवणे सुरू आहे. जनता हुशार आहे. ये पब्लिक हैं, सब जानती हैं !

शैलेन्द्र परांजपे

Disclaimer :-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button