
कोरोनाच्या लसी आता पुण्यातून देशभर आणि जगभर जातील. त्यामुळे गेल्या सात-आठ महिन्यांत शहराचे चित्र ज्या प्रकारे बदलले आहे, ते आपण सर्वांनीच पाहिले आहे. निर्जन रस्ते, संचारबंदी, घराबाहेर माणूस पडला तर त्याला पोलिसांचे भय, निर्जन रस्त्यांचे फोटो मोबाईलमध्ये टिपून सोशल मीडियावर टाकायला बाहेर पडणारे पुणेकर, जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी सैल केली जाणारी संचारबंदी, त्या काळात दुकानांमध्ये होणारी गर्दी, त्या गर्दीत चुकून एखादा खोकला तर त्याच्याकडे समाजशत्रू अशा पद्धतीने बघत वळणाऱ्या नजरा, हे सारं दुःस्वप्नच होतं.
त्यामुळे आता करोनाचं भय गेलं आहे, मिशन बिगिन अगेनमध्ये जीवनाची बहुतांश क्षेत्रं खुली होताहेत. पुण्यातून देशभर जगभर लस जाईल. आता पर्यटनस्थळे, ऐतिहासिक वास्तू, किल्ले खुले झाले आहेत. त्याबरोबरच पुण्यामध्ये खासगी क्लासेसना कामकाज सुरू करण्यास महापालिकेने परवानगी दिली आहे. पुणं हे शिक्षणाचं माहेरघर आणि आता स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन केंद्र म्हणून उदयास येत असल्याने लॉकडाऊनमुळे आपापल्या गावी गेलेले हजारो विद्यार्थी पुन्हा पुण्यामध्ये परत येतील.
खासगी क्लासेस सुरू करण्याच्या निर्णयामुळे पुण्यातल्या घरगुती खानावळी किंवा मेस, छोटी हॉटेल्स, वसतिगृहे, कॉटबेसिसवर चालवली जाणारी विद्यार्थी-विद्यार्थिनी वसतिगृहे या सर्वच आर्थिक अँक्टिव्हिटीज पुन्हा सुरू होतील. गेल्या दीड-दोन महिन्यांपासून कोरोनाची भीती कमी होत गेली. दसरा-दिवाळीनंतर सारे व्यवहार हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले. पण शैक्षणिक क्षेत्रात विशेषतः शाळा, महाविद्यालये सुरू करण्यासंदर्भात निर्णय होऊ शकला नव्हता. त्यामुळे आता जीवनाची जवळपास सर्वच क्षेत्रं बिगिन अगेन मोडमध्ये आली आहेत.
या पार्श्वभूमीवर पुण्याचं समाजजीवन पूर्वपदावर येताना आणि बाहेरगावचे विद्यार्थी परत पुण्याकडे येत असताना काही पथ्ये मात्र आवर्जून पाळण्याची गरज आहे. ती म्हणजे अति उत्साहाने सोशल डिस्टन्सिंगचे निकष पाळणे, मास्क परिधान करणे आणि वैयक्तिक स्वच्छतेकडे कटाक्षाने लक्ष देणे या तीन गोष्टी किमान अधिकृतरीत्या कोरोना भय संपुष्टात आल्याचं जाहीर होईपर्यंत पाळायला हव्यात.
पुण्यात विद्वानांची कमी नाही आणि त्यामुळेच कोणत्याही निर्णयावर साधकबाधक चर्चेच्या नावानं वाटेल त्या आणि वाट्टेल त्या पद्धतीनं चर्चा, टीका केली जाते. वर्तमानपत्रातून वाचकांच्या पत्रात ही अति अभ्यासू मतंही मांडली जातात. अनेकदा त्या मतांना व्हाट्स अँप विद्यापीठातल्या कोणी तरी कुणाला तरी पाठवलेल्या आणि फॉरवर्ड म्हणून आलेल्या पोस्टमधल्या माहितीचा आधार असतो. त्यामुळे कोरोनाबद्दलचे आरोग्यविषयक निकष पाळायला हवेत तसेच सोशल मीडियावर आपण किमान स्वतः खात्री न केलेली माहिती टाकणार नाही, हे पथ्यही पाळायला हवे. तरच समाजात अनावश्यक भीती पसरणे, सामाजिक मनोधैर्य खच्ची होणे, असले प्रकार होणार नाहीत.
पुण्यात हजारो विद्यार्थी परत आल्यावर कोणत्याही सिग्नलला एमएच १२ नसलेल्या दुचाक्या दिसू लागतील. वाहतुकीच्या संदर्भात पुण्यात पुन्हा पहिले पाढे पंचावन्न हे चित्र आताच दिसू लागलेय. त्यामुळे कोणत्याही सिग्नलनंतर लाल दिवा बदलून हिरवा होताना अनेकांचे हात हॉर्नवर जातात; पण एखादा सेकंद कर्कश हॉर्न वाजवायचा मोह आवरला तर सारं काही सुरळीत होतं. तीच गोष्ट सिग्लन सुटल्यावर प्रत्येकाला जणू सीमाभागात लढाईला जायचंय, अशा थाटात पुढे जायची घाई असल्याचं दिसून येतं. आपण कितीही पुढे गेलो तरी आणि खूप हॉर्न वाजवला तरी समाजाच्या फार पुढे जात नाही, याचं भानही ठेवायला हवं.
कोरोना संकटानं आपल्या सर्वांनाच आपलं जीवन किती नश्वर, क्षणभंगुर आहे, याची जाणीव करून दिलेली आहे. त्यामुळे २०२० मध्ये वर्ष संपताना आपण जिवंत राहिलोय, हीच मोठी कामगिरी बजावलेली आहे. म्हणून आता वाहतुकीचे नियम मोडून, कोरोनाचे निकष न पाळून आपण कोणतीही लढाई जिंकू शकणार नाही, हा धडा घेण्याची गरज आहे. तसं झालं तरच कोरोनाविरुद्धचं युद्ध जिंकल्यासारखं होईल. कोरोनोत्तर काळात कोरोनामुळं का होईना, पण माणसं सुधारली असं सिद्ध करणं, ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे. ती सर्वांनी मिळून पार पाडू या.
Disclaimer:-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.शैलेन्द्र परांजपे
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला