कोरोना : भारतात ९१ रुग्णांची नोंद

नई दिल्ली : देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढते आहे. १४ मार्चपर्यंत ९१ रुग्ण आढळले आहेत. यातील कर्नाटकच्या कलबुर्गी येथील ७६ वर्षांचा पुरुष आणि दिल्लीतील ६८ वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला आहे. केंद्र सरकारने मात्र १३ राज्यांत ८३ रुग्ण आढळल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या कुटुंबाला गृह मंत्रालयाने चार लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे.

कलबुर्गी येथील ७६ वर्षांच्या ज्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे तो नुकताच सौदी अरेबियातून आला होता तर दिल्लीत ज्या महिलेचा मृत्यू झाला तिचा मुलगा परदेशातून आला होता. कोरोनाचा रुग्ण होता. ती महिला रक्तदाब आणि मधुमेहाची रुग्ण होती व तिला कोरोनाचीही लागण झाली होती.

महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेशात कोरोनाचे प्रत्येकी दोन नवे रुग्ण आढळले आहे. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात कोरोनाचे १९ रुग्ण आढळल्याची माहिती दिली आहे. उत्तरप्रदेशात गाजियाबादच्या जिल्हा प्रशासनाने एका कुटुंबातील वडील आणि मुलाला कोरोना झाल्याची माहिती दिली आहे. तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात कोरोनाचे दोन रुग्ण आढळले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याशिवाय दोन संशयितांना देखरेखेखाली ठेवले आहे; त्यांच्याबाबताचा अहवाल मिळालेला नाही.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार आतापर्यंत कोरोनाचे १० रुग्ण बरे झाले आहेत. यात उत्तरप्रदेशचे पाच, केरळचे तीन, राजस्थान व दिल्लीचा एक रुग्ण आहे. भारतात आढळलेल्या ८३ रुग्णांमध्ये १७ परदेशी असून त्यातील १६ इटली आणि एक नागरिक कॅनडाचा आहे.