पुणेकरांना निर्वाणीचा इशारा : मॉर्निंग आणि इव्हिनिंग वॉकला निघाल्यास थेट गुन्हा दाखल होणार

corona-pune-police-may-filed-fir-on--morning-walk-people

पुणे : कोरोनाचा वाढत संसर्ग रोखण्यासाठी एकीकडे राज्य सरकार कठोर निर्णय घेत आहेत. तर दुसरीकडे काही शहरांतील लोक सरकारच्या या निर्णयाकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहेत. सोमवारी पुण्यात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. कोरोनाबाधित ५२ वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामुळे पुण्यातील सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. पुणे पोलिसांनी नाकाबंदी कडक केली आहे. विशेष म्हणजे मॉर्निंग  आणि इव्हिनिंग वॉक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

पुण्यात कोरोनाग्रस्तांच्या पहिल्या रुग्णाच्या मृत्यूनंतर जिल्हास्तरावरील सर्व यंत्रणा सचेत झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर मॉर्निंग आणि इव्हिनिंग वॉकसाठी घराबाहेर पडणाऱ्या लोकांवर कलम १८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यात मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना अनेकांना पोलिसांनी वारंवार विनंती आणि आवाहन केलं आहे.  तरीही अनेक जण ऐकत नसल्याने मॉर्निंग वॉक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा सहपोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी दिला आहे.

यासोबतच पोलिसांनी आता मोकाट फिरणाऱ्यांची वाहने जप्त करण्यास सुरुवात केली आहे. पुणे शहरात आतापर्यंत २०० हून अधिक वाहनंही जप्त केली आहेत. त्याचबरोबर कलम १८८ कलमांतर्गत जवळपास ८५० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

सावधान! कोरोना विषाणू संदर्भात ‘एप्रिल फूल’ मेसेज खपवून घेणार नाहीत; पोलीस गुन्हा दाखल करणार