धक्कादायक : कोरोनाबाधित रुग्णाचा आरोग्यमंत्री राजेश टोपेंना भेटण्याचा प्रयत्न

मुंबई :- राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णालयात रुग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अमरावतीत एका कोरोनाबाधित रुग्णाने थेट आरोग्यमंत्री राजेश टोपेंना (Rajesh Tope) भेटण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. माहितीनुसार, अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात हा रुग्ण थेट दाखल झाला. “मी कोरोना पॉझिटिव्ह आहे, मला कोविड रुग्णालयात बेड मिळत नाही. त्यामुळे मला ही तक्रार आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे करायची आहे. मला त्यांची भेट घेऊ द्या.” असे या युवकाने सांगितले.

शुक्रवारी संध्याकाळी घडलेल्या या प्रकारामुळे पोलीस आणि आरोग्य प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाल्याचं पाहण्यास मिळालं. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी अमरावतीतील कोविडच्या परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर बचत भवन येथे लोकप्रतिनिधी आणि आरोग्य प्रशासनातील अधिकाऱ्यांची आढावा बैठकही झाली. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद होती. त्याआधीच हा प्रकार घडल्याने एकच चर्चा सुरू आहे .

पत्रकार परिषदेच्या आधी एक युवक त्या ठिकाणी आला आणि आपण कोरोना (Corona) पॉझिटिव्ह असून आपल्याला कोविड हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नसल्याचा आरोप त्याने केला. आरोग्यमंत्र्यांना भेटून तक्रार करणार असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात एकच खळबळ उडाली. जिल्हाधिकारी कार्यालयात गाडगे नगर पोलीस ठाण्याचे पोलीस दाखल झाले. त्यांनी रुग्णाला समजवण्याचा प्रयत्न केला; मात्र या रुग्णाने जिल्हाधिकारी कार्यालयातच ठिय्या मांडला. त्याने पोलिसांचे काहीही ऐकून घेतले नाही.

याच दरम्यान कोविड हॉस्पिटलमधले कर्मचारी पीपीई किट घालून तिथे पोहचले. संपूर्ण पत्रकार परिषद होईपर्यंत तो तरुण बाहेरच बसून होता. नंतर कशीबशी त्याची समजूत काढून त्याला कोविड रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात नेले. दरम्यान अमरावतीत कोरोनाचे एकूण १२ हजारांपेक्षा जास्त रुग्ण आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER