कोरोना रुग्ण कोणी अस्पृश्य नव्हेत!

सरकारी डॉक्टरांना हायकोर्टाने झापले

Nagpur HC

नागपूर : कोरोनाची (Corona) लागण झालेल्या एका गरोदर महिलेचा सुरक्षितपणे गर्भपात केला जाऊ शकतो का, याचा अहवाल देण्यास सांगितले असता त्या महिलेची वैद्यकीय तपासणी न करताच अहवाल देणार्‍या चंद्रपूरच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील डॉक्टरांना उच्च न्ययालयाच्या नागपूर खंडपीठाने काही दिवसांपूर्वी झापले. तपासणीसाठी अंगाला हातही न लावायला कोरोना रुग्ण हे कोणी अस्पृश्य नव्हेत, असा उपरोधिक टोला न्यायाधीशांनी मारला.

उदरात वाढत असलेले मूल कदाचित गंभर स्वरूपाच्या शारीरिक व मानसिक अपंगत्वासह जन्माला येईल, अशी शक्यता सीटी स्कॅनवरून दिसल्यानंतर या महिलेने गर्भपातासाठी परवानगी मिळावी यासाठी याचिका केली. गर्भारपण सहा महिन्यांच्या पुढे गेलेले असल्याने गर्भपात करणे सुरक्षित होईल का यावर न्या. रवी देशपांडे व न्या. पुष्पा गणेरीवाला यांच्या खंडपीठाने चंद्रपूर सरकारी वैद्यकाय महाविद्यालय रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मेडिकल बोर्डाकडून अहवाल मागविला.

सरकारी वकिलाने डॉक्टरांचा अहवाल १२ ऑक्टोबर रोजी सादर केला. पण याचिकाकर्त्या महिलेची डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी केली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावर नाराजी व्यक्त करत न्यायाधीश म्हणाले की, एरवी कोरोना रुग्णावर सगळीकडे सर्रास उपचार केले जात असताना या कोरनबाधित महिलेची वैद्यकीय तपासणीही केली जाऊ नये, हे अनाकलनीय आहे. तपासणीही न करायला कोरोना रुग्ण म्हणजे कोणी अस्पृश्य नव्हेत. आता डॉक्टरांनी या महिलेची तपासणी करून अहवाल द्यावा व कोरोनातून मुक्त झाल्याखेरीज तिचा गर्भपात करता येईल का हेही कळवावे, असे खंडपीठाने सांगितले.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER