नागपुरात कोरोनाचा उद्रेक : बुधवारी ५९ जणांचा मृत्यू; १,३१९ नव्या रुग्णांची नोंद

Coronavirus

नागपूर : जिल्ह्यात दिवसागणिक कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी भर पडत आहे. बुधवारी दिवसभरात जिल्ह्यामध्ये नवे १ हजार ३१९ रुग्ण आढळून आले. या नव्या रुग्णांसह नागपुरातील बाधितांची संख्या ४४ हजार ५५६ इतकी झाली आहे. ऑगस्ट महिन्यात नागपुरात २४ हजार कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती.

मात्र या महिन्याच्या आठच दिवसांमध्ये तब्बल १५ हजार २१ रुग्णांची नोंद झाली आहे. रुग्णवाढीचा वेग लक्षात घेता या महिन्यात तब्बल ५० हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनाबाधित होण्याची भीतीदेखील व्यक्त केली जात आहे. बुधवारी पॉझिटिव्ह आलेल्या १ हजार ३१९ रुग्णांपैकी ४५० रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.

तर ८६४ रुग्ण हे शहराच्या विविध परिसरातील आहेत. सुखद बाब म्हणजे, बुधवारी १ हजार १०५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. यासह नागपुरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३१ हजार ५६६ इतकी झाली आहे. याशिवाय बुधवारी ५९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आजघडीपर्यंत नागपुरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा १ हजार ४५८ इतका झाला आहे. सध्या नागपुरात रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ७०.५४ टक्के इतके आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER