पुण्याचा कोरोना, सात आंधळे आणि हत्ती

Pune - Coronavirus Editorial

Shailendra Paranjapeपुण्यनगरीचा लौकिक कोरोना रुग्णांच्या बाबतीत अग्रेसर शहर असाही होऊ लागलाय आणि त्याला काही इलाज नाही… कारण कोरोनालाही काही इलाज नाही. वास्तविक पुणं तिथं काय उणं, या काहीशा अभिमानानं विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाकडून ते कोरोनासंदर्भतही नकारात्मकदृष्ट्या आघाडीवरचं शहर असा लौकिक पुण्याला का बरं मिळावा…

हे प्रश्न निर्माण होतात ते पुण्यात रोजच्या रोज वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळं, संशयितांच्या आणि मृत्युमुखी पडणाऱ्यांच्याही संख्येमुळं. हे सारे प्रश्न उद्भवू शकतात, असं कुणाला वाटलंच नाही का कधी? तर नाही असं होऊ शकतं हे अनेक नेते खासगीत गेली दोन दशके बोलताहेत. पण अगदी वैचारिकदृष्ट्या परस्परविरोधी अशा पक्षांच्या नेत्यांनाही ही दृष्टी आहे; पण तरीही पुण्याच्या अक्राळविक्राळ वाढीवर किंवा नियोजनशून्य वाढीवर त्यापैकी कुणाकडेही उत्तर नव्हतं हेही तितकच खरं.

म्हणून तर एकेकाळी शांत, सायकलींचं शहर असलेलं, पुणं आता बकाल झालंय. अगदी पुण्याची मुंबई झालीय, पुण्यात मराठी बोलायची सोय नाही राहिली…पुण्यात पुणेकर बाहेरचे झालेत आणि बाहेरच्यांनी इथं येऊन घरं, बंगले बांधले पण मूळ पुणेकर टाचाच घासत बसलाय, असले सुस्कारेही पुण्यात गेल्या १५-२० वर्षांत सोडले जाऊ लागले. त्यामुळं एकीकडं महानगर बनण्याच्या आकांक्षेनं बेसुमार वाढणाऱ्या पुणे शहरातली नियोजनाची व्यवस्था अचानक कोरोनामुळं उघडी पडली अशी टीकाही काही लोक करू लागलेत. पण थांबा…चित्रं इतकं निराशाजनक नक्कीच नाहीये.

कोरोनामुळं हे प्रश्न विचारले जात असतील, त्याला आकडेवारीचा आधार दिला जात असेल तर पुण्यात कोरोनाबद्दलचं चित्रंही इतकं निराशाजनक नक्कीच नाही, हे सिद्धच करता येतंय. कारण गेल्या दोन-तीन दिवसांपासून मांडल्या जात असलेल्या सरकारी आकडेवारीवरून तरी हे नक्कीच सिद्ध होईल. काय आहे ही आकडेवारी? सरकारी असली तरी इंटरेस्टिंग आहे आणि म्हणून तर त्याची माहिती द्यायला हवी.

पुण्याचा परिसर म्हणजे एकूण क्षेत्र आहे ३०० चौरस किलोमीटरपेक्षा थोडेसे जास्ती आणि त्यात कोरोना रुग्णसंख्या असलेले क्षेत्र आहे ते दहा चौरस किलोमीटरचे. त्यामुळं अख्ख्या पुण्यात कोरोनानं कहर केलाय हे म्हणणं चुकीचं आहे.

त्याच धर्तीवर पुण्यात कोरोनाचे रुग्ण आहेत ४४९९ आण कोरोनामुळं मृत्यू पावलेल्यांची संख्या शून्य आहे. तुम्ही म्हणाल, की काय वेडबिड लागलं काय पण पुण्यात कोरोना संसर्ग झालेल्यांपैकी ५.१३ टक्के म्हणजे २३१ मृत्यू झाले असले तरी त्यापैकी एकाही नागरिकाचा मृत्यू केवळ कोरोना संसर्गामुळं झालेला नाही. या मरण पावलेल्यांपैकी ७१ जणांना मधुमेह वा डायबिटिस होता तर ८० जणांना रक्तदाबाचा म्हणजे ब्लडप्रेशरचा त्रास होता. श्ससनविकाराची हिस्ट्री असलेल्या २४ जणांचा मृत्यू कोरोनाच्या संसर्गानंतर ओढवलाय तर कोरोना संसर्गानंतर मृत्यू पावलेले १९ जण हे मूत्रपिंडाच्या विकारानं ग्रस्त होते. त्याशिवाय कोरोनाच्या संसर्गानंतर मरण पावलेल्यांपैकी १४ जणांना हार्ट ट्रबलची हिस्ट्री म्हणजे हृदयरोगाचा त्रास यापूर्वी झालेला होता. त्याशिवाय मरण पावलेल्यांपैकी १० जण लठ्ठ म्हणता येतील असे म्हणजे बेसिटीवाले होते तर पाच जण हे दारूसेवनाची जोड कोरोना संसर्गाला मिळाल्यानं मरण पावलेले आहेत, असं सरकारचं म्हणणं आहे. त्यामुळं सरकारी माहितीनुसार पुण्यात कोरोनाचा मृत्यू एकही नाही आणि कुठलाही रोग नसताना कोरोना संसर्ग झाला तर त्यातून पूर्ण बरे झालेल्यांमध्ये नव्वदीच्या पुढची व्यक्ती आणि अगदी सहा महिन्यांचं बाळही आहे.

थोडक्यात काय पेपरवाले, टीव्हीवाले पुण्याची काहीही बदनामी करोत पण मायबाप सरकारला पुण्याच्या लौकिकाची काळजी आहे म्हणूनच तर सरकारी माहिती सरकारी माध्यमांवरून म्हणजेच आकाशवाणीसारख्या माध्यमातून आणि काही पेपरवाल्यांकडूनही अशा प्रकारे मांडली जातीय. त्यामुळं पुण्यातला कोरोना म्हणजे सात आंधळे आणि हत्तीच्या गोष्टीसारखा प्रकार आहे. तुम्हाला हवं तसं तुम्ही कोरोनाकडं बघू शकता आणि पुण्याला नावं ठेवू शकता किंवा पुण्याचा लौकिक वाढवू शकता.

शैलेंद्र परांजपे


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER