करोना हरलाय आपल्या व्यवस्थेपुढे…

Corona Article

Shailendra Paranjapeकरोना आता जुना झालाय म्हणजे त्याची दहशत कमी झालीय. करोनामुळं २०२०च्या एप्रिल आणि मे महिन्यात संपूर्ण महाराष्ट्र निर्मनुष्य झाला होता. पुढे जून जुलै महिन्यात मिशन बिगिन अगेन म्हणजे पुनश्च हरिओम म्हणत जीवनाच्या विविध क्षेत्रातलं दैनंदिन जीवन पुन्हा सुरळीतपणे सुरू झालं. गणपती, दसरा दिवाळी या सर्व काळात खरेदीसाठी बाजारपेठा इतक्या फुलल्या की करोना चेंगरून मेला गर्दीत, अशी टीकाही झाली. पण करोना (Corona) गेला या आनंदात आपण सारेच मश्गूल झालो होतो आणि तिकडे युरोपमधे विशेषतः इंग्लंडमधे करोनाचा दुसरा अवतार अधिक भयानक रूपात अवतरला होता.

पुढच्यास ठेच मागचा शहाणा, या न्यायाने खरे तर आपण शहाणे व्हायला हवे होते. पण इंग्लंडमधे आलेला नवा करोना विषाणू तितकासा गंभीर नाही, इथपासून ते आता करोना संपलाय, इथपर्यंतचे निष्कर्ष करोना या विषयात फारसे ज्ञान नसलेले काढत होते. मोबाइलवर व्हाट्स अप विद्यापीठात एखादी पोस्ट टाकण्यासाठी किंवा फॉरवर्डण्यासाठी फारसं डोकं नाही चालवलं तरी चालतं, फक्त बोटं चालवावी लागतात. मग काय, व्हाट्स अप विद्यापीठावरच्या स्वयंघोषित तज्ज्ञांना आणि त्यांच्या करोनावरच्या उपायांना उत आला.

पुण्याच्या मंडईमधे पायजमा आणि पांढरा मळकट म्यानिला, अशा वेषातले पन्नाशीचे साठीचे पुरुष आणि हिरव्या नउवारी साड्या नेसलेल्या अनेक आजीबाई मनाला येईल त्या मसाल्यांच्या पदार्थांचे प्लास्टिकमधले पुडके विकू लागले होते. करोनाचा काढा नावाने लोक वाट्टेल ते विकत होते. लोक कोणत्याही ज्ञानाविना असले काढे प्राशन करत होते आणि त्यातून काही लोकांना मूत्रपिंडविषयक विकारही झाल्याच्या बातम्या झळकल्या.

लहानपणी एक गोष्ट सर्वांना सांगितली जायची. जंगलात पाठीवर पान पडल्यानंतर घाबरून पळत सुटलेला ससा आभाळ कोसळतंय, असं सांगत फिरतो. त्याच्यामागे सारे पळू लागतात आणि सर्वांना आभाळ पडतंय, असं वाटू लागतं, ही ती गोष्ट. करोना नावाच्या सर्वसामान्यांना आणि तज्ज्ञांनाही पुरेशा न समजलेल्या विषाणूने हाहाःकार माजवून दिलाय. सुमारे वर्षभरापूर्वी हे सारं अनुभवल्यानंतर आता पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागल्यानंतर पुन्हा एकदा पुण्याचे नाव देशाच्याच नव्हे तर जगाच्या करोना नकाशावर झळकले आहे.

वास्तविक, एसएमएस म्हणजे सँनेटायझर, मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग या त्रिसूत्रीला पर्याय नाही, हे सारेच तज्ज्ञ पुन्हा पुन्हा सांगत आहेत. तरीही दहा ते पंधरा कोटी रुपये पुण्यासारख्या शहरातून केवळ विनामास्क फिरणाऱ्यांकडून वसूल केला गेलाय, ही गोष्ट करोनापेक्षाही जास्ती चिंताजनक आहे. करोनावर आजही प्रभावी औषध नाही आणि लस घेतल्यानंतरही करोना होणारच नाही, याची खात्री नाही. तरीही आपण बिनधास्तपणे फिरतोय, हे खचितच चांगले नाही. आधी जिवंत रहाणं महत्त्वाचं आहे आणि करोनानं आयुष्यातून जवळपास गेलं संपूर्ण वर्ष वजा केलेलं आहे. त्यामुळे जिवंत रहाणं महत्त्वाचं की फिरणं महत्त्वाचं, हे ठरवायला हवं.

रेमडिसिव्हरचा काळाबाजार, रुग्णालयात बेड न मिळणं, व्हेंटिलेटर न मिळणं, प्राणवायूसह खाटा न मिळणं हे सारं गेल्या वर्षभरात आपण सारेच काहीही शिकलो नाही, याची साक्ष पटवणारं चित्रं आहे. किंवा कदाचित करोनाची दुसरी लाट येतेय तर घ्या हात धुवून, असा विचार करून गरजवंतांना अधिकाधिक लुबाडण्याचेही हे प्रकार असू शकतात. जम्बो कोविड सेंटरमधे स्वच्छतागृहाला पाणी नसणे, रेमडिसिव्हरसाठी रांगा लागणे, त्याचा काळाबाजार होणे आणि वरातीमागून घोडं, याची साक्ष पटवत आरोग्यमंत्र्यांनी रेमडिसिव्हरचा काळा बाजार रोखण्यासाठी उपाययोजना करणे, हे सारं म्हणजे मागच्या वर्षीचा करोना चित्रपट पुन्हा बघतोय की काय, असंच वाटू लागतं. त्यामुळे आपण सारेच करोनानं गेल्या वर्षी शिकलेले धडे पुढचं पाठ मागचं सपाट, या पद्धतीनं शिकलोय, असंच म्हणावं लागतंय.

त्यामुळे नेमेचि येतो मग पावसाळा, या उक्तीप्रमाणे करोना पुन्हा आलाय तर आता पूर्ण विचारपूर्वक लावलेला लॉकडाऊन येईल, पोलिसांना त्यांचं नसलेलं लोकांना काठ्या मारण्याचे काम मिळेल, रिकाम्या रस्त्यांचे फोटो घेणारे उत्साही पुणेकर हळूच रस्तोरस्ती डोकावतील, स्वयंसेवी संस्था पुन्हा एकदा धावून येतील आणि गरजवंतांना मदत करतील पण सरकारी यंत्रणा काही खडबडून जागी होणार नाही कारण करोना लोकांसाठी डेंजर आहे, निर्ढावलेल्या यंत्रणांना करोनाचा फारसा धोका नाही, हे मागच्या वर्षी सिद्ध झालंय आणि यंदाही होतंय.

शैलेन्द्र परांजपे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button