“करोनाने हरवले ? नव्हे शिकवले !”

Corona

कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस वाढत जाणारी संख्या, सतत कानावर येणाऱ्या मृत्यूच्या बातम्या आणि आता तर अगदी उंबरठ्यापर्यंत येऊन पोहोचलेला कोरोना! कुठे मैत्रिणीच्या लहान बहिणीचा कोरोनामुळे (Corona) झालेला मृत्यू, तर कधी डॉक्टर्स आणि करोना वॉरियर्सचा. त्यामुळे रोगाबाबत चिंता, भीती परत वाढायला सुरुवात झालेली आहे. मध्यंतरी सगळ्यांनी मीडियावरचे आकडेवारी, बातम्या बघणे सोडून दिले होते. पण आता उंबरठ्यापर्यंत तो आला म्हणजे गळ्यापर्यंत पाणी आले म्हणा ना !

गेल्या काही महिन्यात आपण अनुभवलेली एक गोष्ट म्हणजे घरातील व घराबाहेरची ची सर्व कामे आपण स्वतः आणि घरातीलच लोक करीत आहोत. यापूर्वी आपल्या हाताशी कामाला मदत करणाऱ्या, कामवाल्या बायका व इतर लोक असायचे. आता स्वतः च आपण या सर्व लोकांना घरी रहा, सुरक्षित रहा, तुमचा पगार मिळेल असे सांगत आलो आणि या परिस्थितीला “न्यू नॉर्मल” म्हणतोय. काही महिन्यांनी हे सगळं नेहमीसारखं होईल. तेव्हा याही सगळ्या गोष्टीही पूर्ववत नॉर्मल होतील म्हणजे परत कोणी कामावर सुट्टी टाकली, उशिरा आलं किंवा नीट काम केलं नाही की आपण त्यांच्यावर रागवू.

परंतु ब्रह्माकुमारी शिवानी दीदी यांनी म्हटल्याप्रमाणे “न्यू नॉर्मलच खरे नॉर्मल आहे” ! एखाद्या दिवशी कोणी कामावर आलं नाही, वा उशिरा आलं तर आपण त्यांच्याशी नीट काळजीपूर्वक बोलावे व चौकशी करावी. त्यांनाही थोडी मदत करावी. आदर द्यावा. याने त्यांचेही वर्तन बदल बदलेल. स्वभाव, संस्कार, बोलण्याची पद्धत, आपल्या आधी इतरांचा विचार करण्याची पद्धत या सामान्य गोष्टी आहेत. आणि त्यालाच “अध्यात्मिक शक्ती “म्हणतात. सेवेमध्ये स्वतःला काही अर्थ नाही, त्यात अहंकार आला, तर आपल्या खात्यात काही जमा होत नाही ” असेही त्या सांगतात.

आणि सध्या खरच एकूणच आपलीही मनस्थिती बदलते आहे .केवळ काही दिवस सुट्ट्या देण्यापुरती किंवा काम केल्याशिवाय पगार देण्याइतकीच नाही, तर आपोआपच आपण आपल्या कामवाल्यांचा विचार करू लागलो आहे. त्यांच्या तब्येतीचा, त्यांच्या घरी येणाऱ्या आर्थिक अडचणींचा, आर्थिक आवक पुरेशी आहे की नाही यांचा! कारण आपल्या सगळ्यांचा शत्रू आता एक झाला आहे. सगळ्यांचा लढा एकाशी लढण्याचा असल्याने आपल्या सगळ्यांमध्ये ऐक्य आलाय असं नाही वाटत तुम्हाला? आणि स्वतः काम केल्यामुळे त्यांचं महत्त्व ही तितकच आपल्याला पटले आहे.

अहो एवढच काय घरातच राहणाऱ्या गृहिणीचे महत्त्व घरातल्या नवरोबाना, मुलांना आणि इतरांना पटायला लागले हे विशेष ! आपण एकेका पदार्थांची फर्माईश करतो, तेव्हा त्यामागे आईचे किती कष्ट असतात. ते घरी राहिल्यामुळे मुलांना कळते आहे आणि मुले चक्क विचारायला लागली आहेत “आई मी काय मदत करू तुला? “हे शिकवलय कोरोना ने आपल्या मुलांना !

आजच एक मन सुन्न करणारी घटना वाचली .शहर पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याच्या कोरोना पॉझिटिव वृद्ध आईची प्रकृती अचानक खालावली. कोवीड सेंटरमध्ये ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर ची सोय नव्हती. खाजगी सेंटर मध्ये एकही बेड शिल्लक नव्हता. आई अंत्यव्यस्त, तिला बघुन मुलाचा जीव कासावीस होत होता. पुढे वरिष्ठांशी फोनाफोनी करून एक बेड मिळाला. ऑक्सीजन, व्हेंटिलेटर चे सोपस्कार होऊन उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांची सत्तर वर्षीय आई जग सोडून गेली.

पैसाअडका, मॅन पॉवर उपलब्ध असूनही, रुग्णांची अफाट संख्या आणि संकटाचा फैलाव एवढा आहे की कोरोना विरुद्ध लढण्याची निकराची तयारी असूनही अडचणी येतात.

हेच शिकवला आहे करोनाने, की तुमच्याकडे जमीन-जुमला पैसा-अडका काहीही असेल पण शेवटी तुमचं तिकीट आले की तुमचा पत्ता कटतो काय करायचं हे सगळे मिळवून? कशासाठी धडपडायच फक्त तेवढ्यासाठी?

बऱ्याच जणांच्या नोकऱ्या जाऊन बेरोजगारीचे संकट येऊ घातले आहे. सगळ्यांनाच काहीतरी बेटर ऑप्शन शोधण्याची वेळ आली आहे. प्लॅन ए, प्लॅन बी समोर ठेवून काही नवीन कौशल्य, काही नवीन तयारी, करण्यासाठी वेळ मिळवून दिला आहे.

कोरोना ने माणसांना आपल्या गावाची ची ओढ लावली, जे आपल्या मातीला विसरून शहराचेच झाले होते. तीच शेती आज सेंद्रिय पद्धत आणि वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून करण्याचे आवाहन आपल्या सुशिक्षित पुत्रांना करते आहे. नकोय तिला त्या रसायनांचा आणि औषधांचा भडिमार!

या दिवसांमध्ये कुठे मोठा शहरातही मोर आणि इतर पक्षी दृष्टीस पडू लागले आहेत, तर कुठे हम- रस्त्यांवर हरणांचा कळप! आकाशाचा खरा निळा रंग डोळ्यांना दिसू लागला आहे.

आणि कटू वास्तव उघड करून दाखवलं आहे कोरोनाने, ते म्हणजे आता जागोजागी ऑक्सीजन सिलेंडर ची कमतरता जाणवायला लागलेली आहे. त्यामुळे “प्रत्येक श्वासाचे” महत्त्व कळलेय. आपल्याच वृक्ष कपातीचा परिणाम, काँक्रिटच्या जंगलांचा परिणाम, सुखसुविधा म्हणून प्रत्येकाने एक स्वतंत्र फोर व्हिलर घेणे किती महागात पडतंय? याची जाणीव अगदी हलवून हलवून करून देतो आहे निसर्ग .” आता तरी जागा हो”असंच सांगतो आहे तो !

पंढरीची वारी नाही करता आली यावर्षी !पण संकर्षण कऱ्हाडे यांनी त्यांच्या एका कवितेत उत्तम वर्णन केल्या प्रमाणे, यावेळी पंढरीला जायची गरजच नाही पडली. स्वतः विठोबाच जागोजागी आणि गावोगावी दर्शन देण्यासाठी पुढे येऊन उभा राहिला,” पी पी इ “किट घालून ! मास्क. लावून! कधी डॉक्टरांच्या रूपाने आणि कधी कोरोना विरुद्ध लढणार्‍या सगळ्याच लढवय्यांच्या रूपाने!

माणसाच्या रूपातला देव आता तरी आपल्याला कळायला हवा. निव्वळ धावत होतो आम्ही. जीवनशैली सुधारायला हवी, मेडिटेशन करायला हवे, दररोज व्यायाम हवाच हवा ,दररोज वेळेवर जेवण जेवायलाच हवे नी बरंच काही! पण हे फक्त म्हणत होतो, घोकत होतो. पण नाही, आम्ही तर फार “बिझी “होतो. वेळ होताच कुठे आमच्याकडे ? आता महत्त्व पटलय !

“एकेक श्वास”किती महत्त्वाचा आहे. माझा, माझ्या जिवलगांचा, सगळ्याच मित्र-मैत्रिणींचा आणि सगळ्याच धरतीमातेच्या लेकरांचा पण !

नातेवाईकांच्या भेटीगाठी होत नाही .प्रत्येक जण बोलण्यासाठी आसुसलेले आहे .पण महत्त्व द्यायचं परस्परांच्या तब्येतीला. त्यामुळे सध्या भेटी व्हिडिओ कॉल वरच! अहो एवढच काय? इंटरनेटचा वापरही आपण योग्य कारणासाठी करायला लागलो आहोत. हे काय कमी आहे?

आम्हाला दररोजच्या जगण्यासाठी काहीच लागत नाही. ब्युटी पार्लर, ड्रेसेस, साड्या, चपला, ज्वेलरी, पाऊचेस, बॅग्स, थरमल वेअर्स, स्वेटर, ट्रॅव्हलकीट, गिफ्ट आर्टिकल्स! जे आमच्याकडे आम्ही, खूप सारं जमा करून ठेवलय काहीच गरज नाहीय त्यांची! पेट्रोल डिझेलही कामापुरतच लागतय !

आणि ऑक्सिजन ?आमच्या पुढील पिढीचे भवितव्य? नातीगोती ,नातेवाईक ,मित्रमंडळी हे सगळं ICU मध्ये आहेत. ज्याचं महत्व, गरज, काळजी आम्हाला वाटेनाशी झाली होती.

एवढेच काय, कुठलीही श्रद्धा किंवा विश्वास हा केव्हाच नाहीसां होवून कुठे नतमस्तकही व्हायला हवं. हे पण आम्ही माणसं विसरलो आहोत!

आता बोला ! काल मी शेवटी विचारलं त्याला,” अरे कोरोना, तू इतका क्रूर का होतोस रे ? पुरे करना आता जास्त हाल करणे !”

यावर त्याने उत्तर दिले,”तुमची मानवजातीची ऐट मला जिरवायची आहे! अशी संकटे आली नाहीत का पूर्वी ? सुनामी आलं, पानशेत धरण फुटून पूर्ण पुण पाण्याखाली गेलं होतं, इथं पासून तर किल्लारीचा भूकंप, गुजरातचा भूकंप आणि येणाऱ्या पूर्वीपासूनच्या प्लेग सारख्या आजाराच्या साथी! माणूस त्यातूनही तरुन गेला. मानव जातीचा आशावाद चिवट वृत्ती खूप कौतुकास्पद आहे. पण यातून जी शिकवण द्यायला हवी ,माणुसकी जपायला हवी, निसर्गाला जपायला हवं, आरोग्याची जोपासना व्हावी हे सगळं विसरून जातो आहे तो! “परत ये रे माझ्या मागल्या !”मला यावेळी म्हणूनच कठोर वागावं लागतय !

तेव्हा मी त्याला प्रॉमिस केलं,” नको रे क्रूर होवू ! आता आम्ही उतणार नाही, मातणार नाही. तू शिकवलेला आणि आम्ही घेतलेला वसा मोडणार नाही! “करूया ना त्याला प्रॉमिस ?

मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER