
नवी दिल्ली : लॉकडाऊन १ जूननंतर वाढणार असला तरी ज्या १३ शहरांमध्ये कोरोनाची साथ फार जास्त पसरली आहे ती शहरे वगळता अन्यत्र हॉटेल्स, मॉल आणि रेस्टारेंट सुरू होण्याची शक्यता आहे.
ही बातमी पण वाचा:- सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मोदींचे देशवासियांना पत्र
गृहमंत्री अमित शहा यांनी लॉकडाऊन संदर्भात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. पुढील लॉकडाऊनची मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्यापूर्वी अमित शहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेची माहिती देतील. पुढील १५ दिवसांसाठीच्या मार्गदर्शक तत्वांची घोषणा ३१ मे रोजी होण्याची शक्यता आहे. रविवारी प्रसारित होणाऱ्या ‘मन की बात’ मध्ये मोदी याबाबत काही चर्चा करण्याचीही शक्यता आहे.
मेट्रो लगेच सुरू होण्याची शक्यता नाही पण भौतिक अंतर पाळून सार्वजनिक वाहतूक सुरू करण्याचा निर्णय होऊ शकतो. दिल्ली आणि एनसीआर ज्यात – गुरुग्राम, फरिदाबाद, नोएडा आणि गाझियाबादमधील व्यवहार सुरू करण्याबाबच्या तोडग्यावर विचार सुरू आहे. याबाबत एका अधिकाऱ्याने सांगितले की, लखनौ आणि नोएडासाठी वेगवेगळे निकष असू शकत नाहीत.
दिल्लीत कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने उत्तरप्रदेश आणि हरयाणा या राज्यांनी दिल्लीची सीमा बंद केली आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि हिमाचलप्रदेशने लॉकडाऊन ३० जूनपर्यंत वाढवावा असे मत व्यक्त केले.
भारतातील कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी ७० % रुग्ण दिल्ली, मुंबई, चेन्नई, अहमदाबाद, ठाणे, पुणे, हैद्राबाद, कोलकाता / हावरा, इंदूर, जयपूर, जोधपूर, चेंगलपट्टू आणि तिरुवल्लूर या १३ शहरांमध्ये आहेत. या शहरांमध्ये प्रतिबंध कठोर असावे अशी केंद्राची भूमिका आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला