चित्रपटगृहांमध्ये अद्यापही शांतताच

पुणे : राज्य शासनाच्या वतीने १५ नोव्हेंबरपासून चित्रपटगृहांना परवानगी देण्यात आली. परंतु, गेल्या तीन महिन्यांमध्ये प्रेक्षकांच्या अत्यल्प प्रतिसादामुळे चित्रपटगृहे ओस पडली आहेत. कोरोनाचा (Corona virus) प्रादुर्भाव सध्या कमी झाला, तरी अद्यापही प्रेक्षकांनी चित्रपटगृहांकडे (cinemas theatre) पाठ फिरवली आहे.

प्रेक्षकांअभावी दररोजचे शो रद्द करत आहेत. परंतु, शासकीय कर, देखभाल-दुरुस्ती, कामगार खर्च आदींमुळे चित्रपटगृह व्यावसायिकांचे अक्षरश: कंबरडे मोडले आहे.

राज्य शासनाचे सर्व नियम पाळून हा व्यवसाय सुरू आहे. यामध्ये १ सीट रिक्त ठेवून आसन क्षमता तसेच स्क्रीनिंग, सॅनिटायझर अशा पद्धतीचे नियम पाळण्यात येत आहेत.

शासकीय नियमांचे पालन करताना चित्रपटगृहमालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. थर्मल स्क्रीनिंग, सॅनिटायझर, मास्क आदी गोष्टी आवश्यक आहेतच; त्याचबरोबर प्रत्येक प्रेक्षकाकडे आरोग्य सेतू’ अॅप असणे गरजेचे आहे. जर नसेल तर अॅप चित्रपटगृहामध्ये इन्स्ट्रॉल करून घेऊन तपासणी करूनच प्रेक्षागृहात प्रवेश दिला जातो. त्यामुळे अनेकदा वादावादीचे प्रसंग घडत आहेत किंवा चित्रपट न पाहताच प्रेक्षक घरी जात असल्याचे चित्र आहे.

केंद्र शासनाने १०० टक्के प्रेक्षक संख्या करण्याचा आदेश जारी केला असला, तरी राज्य शासनाने मात्र ५० टक्केच प्रेक्षक उपस्थित ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे यासाठी चित्रपटगृहचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

मल्टिफ्लेक्समध्ये आयोजित शो रद्द न करता १ किंवा २ प्रेक्षकांच्या उपस्थितीत शो सुरू करावा लागत आहे. यामध्ये देखभाल-दुरुस्ती, कामगार खर्च व इतर याचा बोजा चालकांनाच सोसावा लागत आहे. इचलकरंजी येथील मल्टिफ्लेक्समध्ये तर काही शोचे तिकीट दर अत्यल्प म्हणजे ५० रुपयांपर्यंत ठेवण्यात आले आहेत. जेणेकरून प्रेक्षकांनी चित्रपटगृहांमध्ये येऊन चित्रपट पाहावा, हा उद्देश आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शासनाने चित्रपट व्यवसायासाठीचे नियम शिथिल करण्याची गरज असल्याचेही चालकांचे म्हणणे आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER