… तर उद्धव ठाकरे आपल्या जवळच्या व्यक्तीलाही सोडत नाहीत: संजय राऊत

मुंबई : राज्यात कोरोनाचे संकट पुन्हा वाढत चालले आहे . यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे नियम तोडल्यास आपल्या जवळच्या व्यक्तीलाही सोडत नाहीत, असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले. पोहरादेवी येथे कोरोना प्रतिबंधासाठी घालून देण्यात आलेले निर्बंध झुगारुन गर्दी जमली होती. यासाठी संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे संजय राऊत यांनी सांगितले.

संजय राऊत बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांना पोहरादेवी येथे संजय राठोड यांच्या समर्थनासाठी झालेल्या गर्दीविषयी विचारणा करण्यात आली. त्यावर संजय राऊत यांनी संबंधितांवर कठोर कारवाई होईल, असे सांगितले. पोहरादेवीत नियमांचे उल्लंघन झाले आहे. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

उद्धव ठाकरे हे कायद्याची आणि नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करतात. ते आपल्या जवळच्या व्यक्तीलाही सोडणार नाहीत. त्यामुळे याप्रकरणात राज्य सरकारकडून कायद्याचे पालन केले जाईल, असे संजय राऊत यांनी म्हटले. तर संजय राठोड यांच्या शक्तीप्रदर्शनावर मुख्यमंत्री आणि शरद पवार नाराज आहेत का , या प्रश्नावर संजय राऊत यांनी चुप्पी साधली .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER